खालापूरमध्ये भोंदू बाबाचे संतापजनक कृत्य; जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार!

 


खोपोली /मानसी कांबळे :- रायगड जिल्ह्यातील खालापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. संकटात सापडलेल्या एका महिलेला मदतीचे आणि जादूटोणा उतरवण्याचे आमिष दाखवून एका भोंदू बाबाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय महिला आपल्या कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावात होती. याच काळात तिची ओळख अब्दुर रशीद उर्फ बाबाजान (वय ४० वर्षे, रा. कळंबोली, नवी मुंबई) याच्याशी झाली. आरोपीने पीडितेच्या मनात भीती घातली की, "तुझ्यावर कोणातरी काळी जादू (Black Magic) केली आहे आणि ती उतरवावी लागेल."

डिसेंबर २०२४ मध्ये, आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला खालापूर येथील एका ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी मध्यरात्री १:०० ते पहाटे ५:३० च्या दरम्यान अघोरी पूजा आणि काळ्या जादूच्या नावाखाली आरोपीने पीडितेवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर, कोणाला सांगितल्यास "तुला बघून घेईन" अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेने धीर एकवटून खालापूर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आहे.

कलम ६४,कलम ७४,कलम ११५(२) व ३५१(२),महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ (कलम ३): या विशेष कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाशिव पवार करत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी