बाळासाहेब भवन, कर्जत येथे खालापूर तालुक्याची आढावा बैठक उत्साहात संपन्न...
खालापूर /सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांच्या उपस्थितीत आज, दि. 4 एप्रिल 2026 रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे दुपारी 12 वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला तालुकाप्रमुख संदेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाई शिंदे, खालापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रोशन मोडवे, खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उत्तर रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रियाताई साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, शहर प्रमुख, युवा पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभागप्रमुख व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान तालुकाप्रमुख संदेश पाटील, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन औसरमल तसेच भाई शिंदे यांनी पक्ष संघटनेची सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव येथील सभेनंतर ही पहिली आढावा बैठक होत आहे. 24 वर्षांनंतर होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या बी.एल.ओ. (BLO) अधिकाऱ्यांच्या कामावर पक्षाच्या बी.एल.ए. (BLA) प्रतिनिधींनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
तसेच, प्रत्येक वॉर्डमध्ये जनगणना प्रक्रियेवर सतत नजर ठेवून मतदार याद्यांची अचूकता सुनिश्चित करणे हे पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या 15 एप्रिलपूर्वी प्रत्येक मतदान बूथवर बी.एल.ए.ची नियुक्ती पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संघटना बळकट करण्यावर भर देत, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या विकासकामांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. आगामी जनगणनेनंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारसंख्या वाढण्याची शक्यता असून महिलांना आरक्षण मिळण्याची संधी आहे. त्यामुळे सर्वांनी सजग राहून नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक गावात होणाऱ्या बैठकीत मी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
"पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वेळप्रसंगी भाकरीही फिरवली जाईल. कार्यकर्त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना योग्य ती जबाबदारी दिली जाईल."
एकूणच, ही बैठक पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दिशा देणारी ठरली.

Comments
Post a Comment