मस्को कंपनीच्या जागेतील वेताळ मूर्ती विटंबना प्रकरण; ग्रामस्थ आक्रमक, नगरपालिकेकडून विकसकाचे काम बंद

 


खोपोली/मानसी कांबळे : - खोपोली नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावाजवळ असलेल्या महिंद्रा उद्योग समूहाच्या ‘मस्को’ (MUSCO) स्टील कारखान्याच्या अतिरिक्त जागेत श्रद्धास्थान असलेल्या वेताळ देवाच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने मूर्ती हलवण्यात आल्याने संपूर्ण खोपोली आणि लव्हेज परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज संतप्त ग्रामस्थांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला.

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी संबंधित ठिकाणी सुरू असलेली सर्व विकासकामे तातडीने थांबवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

या वादाची पार्श्वभूमी सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा या अपेक्षेने लव्हेज येथील ग्रामस्थांनी आपली सुपीक शेती मस्को (महिंद्रा स्टील) कारखान्यासाठी दिली होती. कारखाना उभारल्यानंतर काही अतिरिक्त जागांवर निवासी संकुले उभारण्यात आली. याच परिसरात वेताळ देवाचे जुने देवस्थान असून ग्रामस्थांची त्यावर मोठी श्रद्धा आहे.

मात्र अलीकडे ही निवासी संकुले पाडून त्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने देवस्थानाचा कोणताही आदर न राखता जेसीबीद्वारे मूर्ती हलवली. ही बाब समोर येताच ग्रामस्थांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून तत्काळ कारवाई न झाल्याने महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी आज नगरपरिषदेवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला.

बैठकीत सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे आणि रवींद्र रोकडे यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडत प्रशासनाला जाब विचारला. “ज्या जमिनी रोजगारासाठी दिल्या, त्याच ठिकाणी आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना विकसकाचे काम तातडीने थांबवण्याचे लेखी आदेश दिले. तसेच पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगररचना अधिकारी ठाकूर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने तत्काळ कारवाई केल्याने ग्रामस्थांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली असली, तरी दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी