सामाजिक कार्याचा सन्मान : ॲड. प्रल्हाद बट्टेवार यांना ‘समाजभूषण पुरस्कार 2026’ पुरस्काराने सन्मानित....

 

खोपोली / मानसी कांबळे :-खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रल्हाद विश्वनाथ बट्टेवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बट्टेवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार शुक्रवार, दि. 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता ‘फाउंटन इन (लिमोनेट लीला)’, पोस्ट – नडगाव तर्फे बीरवाडी, मुंबई-गोवा महामार्गावरील न्यू सावित्री ब्रिजजवळ, ता. महाड, जि. रायगड येथे आयोजित ‘स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलन 2026’ मध्ये प्रदान करण्यात आला आहे. या समारंभात अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते ॲड. बट्टेवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशन रायगड (भारत) आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲड. प्रल्हाद विश्वनाथ बट्टेवार हे सध्या एका खाजगी कंपनीत कार्यरत असून ते अखिल भारतीय मातंग संघ तसेच भारतीय बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

शैक्षणिक पात्रता : - त्यांनी एम.ए. (इतिहास), एम.ए. (राज्यशास्त्र), एम.ए. (मराठी), एम.ए. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज), एम.एस.डब्ल्यू. (सोशल वर्क), एल.एल.बी., एल.एल.एम. (मानवी हक्क), डी.एल.एल. अँड एल.डब्ल्यू. तसेच मुंबई विद्यापीठातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार’ या विषयातील पी.जी.डी. शिक्षण पूर्ण केले आहे.

वैयक्तिक व सामाजिक प्रवास : -लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या बट्टेवार यांनी अवघ्या १३व्या वर्षी, १९८५ साली क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात सहभागी होत समाजकार्यात पहिले पाऊल टाकले. १९९० पासून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

२००३ पासून त्यांनी अखिल भारतीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्यांनी २००३ मध्ये खोपोली शहर सेक्रेटरी, २००५ मध्ये रायगड जिल्हा उपाध्यक्ष, तर २०१३ मध्ये जिल्हा सेक्रेटरी अशी विविध पदे भूषवली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०२४ मध्ये त्यांना रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलन, मंत्रालयावर मोर्चे तसेच नागपूर अधिवेशनावर काढलेल्या मोर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजाच्या हक्कांसाठी ते सातत्याने लढा देत आहेत.

खोपोली शहरात ‘अण्णाभाऊ साठे सभागृह’ उभारण्यासाठी त्यांनी २००५ पासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर २०१३ साली हे सभागृह पूर्णत्वास आले. तसेच २००६ पासून खोपोलीत अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली असून आजही ती उत्साहात कायम आहे.

ते ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळ’ चे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य मातंग समाज सेवा संघ आणि क्रांतीसम्राट स्व. डॉ. बाबासाहेब गोपले विचार मंच यांच्याशी संलग्न आहेत.

इतर कार्य व योगदान : - सामाजिक कार्याबरोबरच ते गरीब व गरजू नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करणे, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणे अशी महत्त्वाची कामे करतात. कामगार क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावत सचिन अहिर प्रणित कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.

पुरस्कार व गौरव : - समाजभूषण पुरस्कार (महाराष्ट्र शासन) 2023-24,गुणवंत कामगार पुरस्कार 2025, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026 तसेच राज्यस्तरीय 17 पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी