कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नावाने महिलांनी केला शिमगा....
खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत येणाऱ्या बार्डी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कर्जत तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेतून बार्डीला पाणीपुरवठा केला जात असला तरी मागील एक ते दीड वर्षांपासून तो पूर्णपणे अनियमित झाला असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
चार-चार, पाच-पाच दिवसांनी नळांना पाणी येते. त्यातही पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने एक हंडाभर पाणी भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिले असून ग्रामसभेतही विषय मांडला आहे. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तसेच पंचायत समिती कर्जत येथील गटविकास अधिकाऱ्यांनाही लेखी निवेदने देऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली, तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. दरम्यान, बार्डी गावाकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर अनेक अनधिकृत जलवाहिनी जोडून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या जोडण्यांमुळेच पाण्याचा दाब कमी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामागे आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“आमच्याकडे सर्व लेखी अर्जांच्या प्रती उपलब्ध आहेत. पाणीप्रश्न तातडीने न सुटल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा बार्डी ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे गरजेचे आहे, अन्यथा बार्डीतील असंतोष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


Comments
Post a Comment