निंबोडे येथे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात संपन्न

 


खालापूर /सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील निंबोडे येथे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धार्मिक शिस्त आणि परंपरा जपणाऱ्या या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थ, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गुरुवर्य दादा महाराज राणे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप दिलीप महाराज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 4 ते 6 वाजता काकड आरतीने झाली. ही आरती मुक्ताबाई महिला मंडळ आणि श्रीराम नवतरुण मंडळ, निंबोडे यांच्या सहभागातून पार पडली. त्यानंतर सकाळी 7 ते 7.30 वाजता कळसपूजन माजी उपसभापती उमेश गावंड, डॉ. सौ. चेतना उमेश गावंड तसेच नगराध्यक्ष सौ. रोशना नरेश मोडवे (नगरपंचायत खालापूर) यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर सकाळी 7 ते 8 वाजता श्रीराम प्रभूंची महापूजा खालापूर येथील उद्योजक महेश राठी आणि उपनगराध्यक्ष किशोर पवार यांच्या हस्ते विधीवत पार पडली. पुढे आदरणीय दिलीप भाऊ राणे (हलीवली, कर्जत) यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन झाले, ज्यामुळे वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.

त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन उमेश गावंड यांच्या सौजन्याने करण्यात आले. दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यानही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. हा हरिपाठ रामचंद्र महाराज मिसाळ, नवतरुण मंडळ निंबवडे-वनवे, खालापूर येथील महिला मंडळ तसेच गावातील माहेरवाशीण महिलांच्या सहभागातून अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी महाड येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संभाजी पाटील, तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि दोन्ही गावांतील मान्यवर उपस्थित होते.

रात्री नऊ नंतर प्रभू श्रीराम यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, तोही अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, श्रीराम जन्मोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी