भगवान महावीरांच्या 'जियो और जीने दो' मंत्राचा जागर; खोपोलीत ओसवाल परिवारातर्फे पाणपोईचे भव्य उद्घाटन!
श्री विमलनाथ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, खोपोली यांच्या वतीने आज शहरात भव्य 'वरघोडा' (मिरवणूक) काढण्यात आली. जैन समाजाच्या शेकडो बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. भगवान विमलनाथ आणि भगवान महावीर यांच्या जयघोषाने संपूर्ण खोपोली बाजारपेठ दुमदुमून गेली होती.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना, तहानलेल्यांना पाणी पाजणे हाच खरा धर्म मानून, श्रीमती वरजूबाई देवीचंदजी ओसवाल यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सूनबाई तपस्वी सौ. संगीता किशोर ओसवाल यांच्या 'वार्षिक तप' पूर्ततेनिमित्त, ओसवाल परिवारातर्फे एका भव्य पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे. या पाणपोईचे उद्घाटन परमपूज्य जैन मुनींच्या पावन उपस्थितीत संपन्न झाले.
या सोहळ्याला जैन मुनी श्री मोहनलालजी महाराज, जैन मुनी श्री मुक्तिप्रभ सूरीश्वरजी महाराज आणि जैन मुनी श्री भानुरत्न-हर्षरत्न मुनी महाराज यांचे विशेष सानिध्य लाभले. गुरुदेवांच्या हस्ते आणि मंगल मंत्रोच्चारात या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओसवाल परिवारातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये श्री. किशोर ओसवाल आणि श्री. गणेश ओसवाल, तसेच त्यांच्या पत्नी तपस्वी सौ. संगीता किशोर ओसवाल व सौ. पिंकी गणेश ओसवाल यांचा सक्रिय सहभाग राहिला. कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच नातू चैतन्य किशोर ओसवाल, जैनम किशोर ओसवाल, नातसून सौ. डोली चैतन्य ओसवाल आणि नात प्रियंता गणेश ओसवाल यांनी देखील या सेवाकार्यात उत्साहाने सहभाग घेतला.
याप्रसंगी श्री विमलनाथ जैन संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष पोरवाल यांच्यासह संघाचे सर्व विश्वस्त आणि खोपोलीतील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. "केवळ धार्मिक विधी न करता प्रत्यक्ष समाजसेवा करणे, हीच भगवान महावीरांना खरी श्रद्धांजली आहे," अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
तप, सेवा आणि भक्तीचा हा त्रिवेणी संगम आज खोपोलीत ओसवाल परिवार आणि जैन संघाच्या माध्यमातून पहायला मिळाला.

Comments
Post a Comment