खोपोलीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड; भर उन्हात लांबच लांब रांगा....
खोपोली / खलील सुर्वे : - खोपोली शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून गॅस एजन्सीबाहेर भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लक्ष्मी नगर परिसरातील एचपी गॅस एजन्सीसमोर गुरुवारी पहाटे 6 वाजल्यापासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती. सुमारे 500 मीटरपर्यंत रांगा लागल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
तासन्तास प्रतीक्षा, नागरिकांमध्ये संताप :- गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना 5 ते 7 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काहींना दोन दिवस प्रयत्न करूनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. “टोकन पद्धतीने सिलेंडर वाटप करावे,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
कोटा कमी; वितरण व्यवस्थेवर ताण :- गॅस एजन्सीचे मालक साखरे यांनी सांगितले की, एजन्सीला मिळणारा सिलेंडरचा कोटा कमी झाल्याने मागणी-पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. परिणामी वितरण व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम? :- अमेरिका तसेच इस्रायल-इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीचा इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून नागरिकांमध्ये गॅस तुटवड्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण अतिरिक्त सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑनलाईन बुकिंग ठप्प; OTP अडचणी :- ऑनलाईन बुकिंगदरम्यान ओटीपी (OTP) न मिळणे, तसेच घरपोच सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना प्रत्यक्ष एजन्सीवर जावे लागत आहे. उपलब्धता असूनही वितरणातील अडचणींमुळे नागरिक त्रस्त आहेत.
मूलभूत सुविधांचा अभाव :- रांगेत उभ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. भर उन्हात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवास खर्चाचा अतिरिक्त बोजा :- गॅस सिलेंडरसाठी एजन्सीपर्यंत ये-जा करण्यासाठी नागरिकांना 50 ते 100 रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भारही वाढत आहे.
चौकशीची मागणी :- एजन्सीकडे दररोज किती सिलेंडरचा कोटा मिळतो, गोडाऊनमधील साठा किती आहे, तसेच संध्याकाळी वितरण कुठे केले जाते याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, खालापूर तहसीलदार व पुरवठा विभाग याकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची गरज :- गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments
Post a Comment