तांबडी वसाहतीत स्वच्छता अभियान; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
खोपोली /मानसी कांबळे :- हुमाना पीपल टु पीपल, नीरामया प्रोजेक्ट मुंबई आणि सहयोग मर्क स्पेशालिटी प्रा. ली. या सेवाभावी संस्थांच्या वतीने खोपोली तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील तांबडी वसाहत परिसरात दि. १६ मार्च २०२६ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता अभियानात स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “आपले घर, आपला प्रभाग आणि आपली जबाबदारी” या भावनेतून येथील महिला व मुलांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक श्री. अमितजी फाळे यांनी कौतुक केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष नाईक यांनीही या अभियानासाठी मोलाचे सहकार्य केले. खोपोली नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचेही या मोहिमेला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विभाग प्रमुख व लीडर श्री. विठ्ठल ठाकरे, सरिता पेंडाम, रविना गायकवाड आणि अॅड. प्रल्हाद बट्टेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
हुमाना पीपल टु पीपल ही संस्था गेल्या दीड वर्षांपासून खोपोली विभागात कार्यरत असून शांतीनगर, क्रांतीनगर, प्रकाशनगर, यशवंतनगर, मिळगाव, शीळगाव, सुभाषनगर, सम्राट अशोकनगर आणि तांबडी वसाहत अशा झोपडपट्टी भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. संस्था संसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती करत असून उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी चर्चासत्रे आयोजित करते.
याशिवाय महिला समुदायासाठी आरोग्य शिबिरे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका आणि शासकीय नर्सेस यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व चर्चा सत्रे आयोजित केली जातात. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरेही घेतली जातात.
महिला व मुलींसाठी आरोग्य गट स्थापन करणे, आरोग्य, स्वच्छता, पाणी व पर्यावरण या विषयांवर जनजागृती करणे आणि दरमहा किशोरी मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करणे असे विविध उपक्रमही संस्था सातत्याने राबवत आहे.
संस्थेच्या या सामाजिक कार्याचे खालापूर व खोपोली परिसरातील सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातही हे कार्य अशाच प्रकारे सुरू राहावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


Comments
Post a Comment