नेतृत्वाचा नवा अध्याय: सौ. जैबुनीसा हमीद शेख यांची ‘एकता मंच’च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड....
खोपोली/प्रतिनिधी :- कर्तृत्व, जिद्द आणि समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वाने पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपली छाप पाडली आहे. खोपोली शहरासह रायगड जिल्ह्यात ‘खंबीर चेहरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. जैबुनीसा हमीद शेख यांची ‘एकता मंच ठाणे’ या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या प्रभावी कार्याची दखल घेत, २८ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
एकता मंचच्या जिल्हाध्यक्ष पदावरून थेट राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर झालेली त्यांची बढती ही त्यांच्या संघटन कौशल्याची आणि वाढत्या जनसंपर्काची साक्ष देणारी आहे.
जैबुनीसा शेख या केवळ राजकारणा पुरत्याच मर्यादित नसून, विविध जिल्हा व राज्यस्तरीय संस्थांमधून त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. विशेषतः मुस्लिम समाजातील महिलांच्या समस्या मांडणे, तसेच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही त्यांची ठळक ओळख आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल केली आहे.
या निवडीमुळे खोपोली आणि रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, एकता मंचचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“ज्या जोमाने त्यांनी तळागाळातील महिलांसाठी काम केले, त्याच जोमाने त्या आता राज्यपातळीवर कार्याचा विस्तार करतील,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Post a Comment