हिप्परगा थडी येथील कुंभार समाजातील युवती कु. अनुराधा आमेटवार यांची नांदेड पोलीस दलात निवड...
नांदेड /जावेद अहमद :- राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शारीरिक व लेखी परीक्षांसाठी शहरी भागात राहून अभ्यास करत असून, त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी शेतकरी पालक मोठ्या कष्टाने आर्थिक मदत करत आहेत.
अशाच परिस्थितीत हिप्परगा थडी येथील अल्पभूधारक शेतकरी आबन्ना शिवना आमेटवार यांच्या कन्या कु. अनुराधा आबन्ना आमेटवार यांनी आपल्या जिद्दी, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर नांदेड पोलीस दलात यश मिळवले आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि त्या एकुलती एक मुलगी असा परिवार आहे. आपल्या यशाने त्यांनी कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. अनुराधा यांचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ली ते ५ वी) हिप्परगा थडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे पूर्ण झाले. त्या लहानपणापासूनच जिद्दी व अभ्यासू होत्या. त्यांनी दहावीमध्ये ७४.६०% व बारावीमध्ये ७७.५४% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्णता मिळवली.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला व पदवी परीक्षेत ७६.०३% गुणांसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. पदवी पूर्ण झाल्यानंतर देशसेवा करण्याची इच्छा मनात बाळगून त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. मोठ्या भावाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला.
तयारीसाठी त्यांनी नांदेड येथे राहून मराठी विषयासाठी संभाजी कदम सर, तसेच गणित विषयासाठी सचिन गोमाशे सर यांच्याकडे मार्गदर्शन घेतले. २०२५ मधील ही त्यांची पहिलीच भरती होती. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शारीरिक चाचणी व १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशामुळे त्या हिप्परगा थडी गावातील कुंभार समाजातून तसेच महिला प्रवर्गातून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, ही गावासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पप्पू महाराज, कौठकर सर, गजानन आरसेवार आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
तसेच त्या दैनिक अधिकारनामा बिलोलीचे प्रतिनिधी आमेटवार राजेश यांच्या भगिनी आहेत.

Comments
Post a Comment