खोपोलीत अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; नगर परिषदेची बुलडोझर कारवाई, वाहतुकीला दिलासा....
खोपोली /प्रतिनिधी :- खोपोली शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर नगर परिषदेने कठोर पावले उचलत ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणांवरील अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांवर बुलडोझर चालवून प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून शहरात याची मोठी चर्चा सुरू आहे..
पाटणकर चौक, महावीर गार्डन, बसस्थानक परिसर तसेच महामार्गालगतच्या भागात नगर परिषदेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता रस्ते मोकळे केले.
या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकांनी नगर परिषदेच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत करत, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान व्यक्त केले.
नगर परिषदेने ही मोहीम केवळ मुख्य चौकांपुरती मर्यादित न ठेवता, पुढील टप्प्यात भाजी मार्केट रोड, मुख्य बाजारपेठ आणि शिळफाटा परिसरातही अतिक्रमण हटविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इतर अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment