उमराहसाठी रवाना होणाऱ्या अलीभाई कर्जीकर यांचा सत्कार

अब्बास भाई सुर्वे व हाजी सईद चाचा यांच्या हस्ते हार, शाल देऊन शुभेच्छांचा वर्षाव

खोपोली / खलील सुर्वे :- हाळ खुर्द (ता. खालापूर) येथील रहिवासी अली भाई कर्जीकर व त्यांच्या पत्नी उमराह हजच्या पवित्र यात्रेसाठी रवाना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भावनिक सत्कार करण्यात आला. अब्बास भाई सुर्वे, त्यांच्या पत्नी तसेच हाजी सईद चाचा यांच्या हस्ते हार, शाल देऊन गुलपोशी करीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

२३ मार्च रोजी पहाटे अली भाई कर्जीकर व त्यांची पत्नी पवित्र मक्का - मदिना नगरीकडे उमराह हजसाठी प्रस्थान करीत असून यानिमित्त गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थितांनी “अल्लाह तुमचा उमरा कबूल करो, प्रवास सुरक्षित व आनंददायी होवो” अशा दुवांसह शुभेच्छा दिल्या.

* हज-उमराहचे धार्मिक महत्त्व :- इस्लाम धर्मातील हज ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा असून ती इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानली जाते. शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमासाठी हज करणे हे कर्तव्य मानले जाते. उमराह ही देखील अत्यंत पवित्र यात्रा असून वर्षातील कोणत्याही काळात केली जाऊ शकते.

* इहरामचे नियम व शिस्तीचे पालन आवश्यक :- उमराह हजसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना ‘इहराम’ धारण करणे आवश्यक असते. इहराम म्हणजे स्वतःला सर्व प्रकारच्या पापांपासून दूर ठेवण्याची पवित्र अवस्था. या अवस्थेत यात्रेकरूंना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. यामध्ये भांडण किंवा वाद टाळणे, कोणतीही निंदानालस्ती न करणे, केस किंवा नखे न कापणे, जीवहानी न करणे, तसेच संयम राखणे यांचा समावेश होतो. हे नियम मानवतेचा, संयमाचा आणि आत्मशुद्धीचा संदेश देतात.

* काबा शरीफ व धार्मिक विधींचे महत्त्व :- मक्का येथील काबा हे “बैतुल्लाह” अर्थात अल्लाहचे घर मानले जाते. यात्रेकरू येथे सात वेळा तवाफ (परिक्रमा) करतात. तसेच सफा व मरवा या टेकड्यांदरम्यान सात वेळा चालणे (सई) ही देखील उमराहची महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही परंपरा हजरत इस्माईल व त्यांची माता हाजरा यांच्या संघर्षाची आठवण करून देते. या सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर केस काढण्याची प्रक्रिया पार पडते आणि उमराह पूर्ण झाल्याचे मानले जाते.

* गावकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव :- अली भाई कर्जीकर व त्यांच्या पत्नी या पवित्र यात्रेसाठी रवाना होत असल्याने संपूर्ण हाळ खुर्द गावातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या प्रवासासाठी सुरक्षितता, आरोग्य व अल्लाहची कृपा लाभावी, अशी सर्वांनी प्रार्थना केली.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी