खोपोलीत ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न......
खोपोली/सुधीर माने :- इनरव्हील क्लब खोपोलीच्या वतीने दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ नागरिक हॉल येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसाठी डिजिटल मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशिक्षणासोबतच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दीना शहा, सेक्रेटरी मधुमिता, व्हाइस प्रेसिडेंट राजश्री आणि आयपीपी जयश्री कलोशी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गणेश पूजनानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
यानंतर क्लबच्या अध्यक्षा दीना शहा यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोडके आणि सेक्रेटरी श्री. नरेंद्र हर्डीकर यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आयपीपी जयश्री कलोशी यांच्या सुरेल गाण्याने वातावरण आनंदी झाले.
व्हाइस प्रेसिडेंट राजश्री यांनी मोबाईलमधील दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असलेल्या विविध फिचर्सची माहिती सविस्तरपणे दिली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत, प्रश्न विचारत आणि प्रत्यक्ष सराव करत हे प्रशिक्षण आत्मसात केले.
यानंतर पासिंग द रुमाल, हौजी-हौजी तसेच काही सरप्राईज गेम्स घेण्यात आले. या सर्व उपक्रमांचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला. विजेत्यांना विविध बक्षिसेही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि सदस्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे ५० सदस्य तसेच इनरव्हील क्लबचे १७ सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment