आटपाट नगरचा राजा... आणि 6 हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट!

 वाचक मित्रांनो,

          रोजच्या बातम्यांच्या गर्दीतून थोडा विरंगुळा म्हणून आज एक गोष्ट सांगतो, पण ही गोष्ट केवळ गोष्ट नसून लोकशाहीच्या आरशात दिसणारी एक वस्तुस्थिती आहे.

"तुम्हाला एका गावाची...लोकशाहीतील राजाची...अन् त्याच्या कारभाराची गोष्ट सांगत आहे. दोन प्रदेशांच्या सीमेवर एक आटपाट नगर होते. इतिहासाने समृद्ध, परंपरेने नटलेले आणि स्वतंत्र परागणा (तालुका) होण्याची क्षमता असलेले हे नगर. ऐवढेच नव्हे तर स्वतंत्र तरफ / स्वतंत्र महाल (नगर पंचायत) होवू शकते... आटपाट नगर ही ऐतिहासिक नगरी व शेकडो वर्षांची पार्श्वभूमी असलेला ऐवढेच नव्हे ज्या 'महाला'तून या आटपाट नगरचा राज्य कारभार चालतो, त्याला शतकीय काळ उलटला. ही बाब अलाहिदा की, आटपाट नगरच्या राजाने अन् प्रधान मंडळाने 'रौप्य महोत्सव' सोहळा साजरा केला नाही. "

आटपाट नगरचा राज्यभार ज्या राजाच्या माध्यमातून हाकलला जातो, तो विद्वान, सुसंस्कृत अन् मानमरताब असलेला आहे. प्रजेला त्यांचा 'राजतिलक' करतांना खूप खूप आनंद झाला होता आणि त्याच्याकडून खूप खूप आशा होत्या. राज्याचा चहूबाजूंनी विकास होईल, राज्य सुजलाम् सुफलाम् होईल पण विरोधक व शेजारच्या राजाच्या हल्ल्यांनी राज्याला जेवढे नुकसान झाले नाही, तेवढे नुकसान 'होय रे महाराजा' या आश्वासनांनी झाले. राज्यातील प्रवेशद्वारावर अंधार पसरलेला आहे, मोठ्या हौसेने लावलेले "नंदादीप" विझले पण राज्य कारभाराचा भार ऐवढा की, वर्ष लोटली पण उजेड काही आला नाही. राज्यातील "सरिता"...राम तेरी गंगा मैली हो गई...अशी म्हणण्याची वेळ येईपर्यंत तिचा जीव घेतला गेला आहे. राज्यातील सर्वच प्रवेशद्वारांवर सकाळ - संध्याकाळ मानवी गुलाबांची महक (सुगंधी) असते. राज्यात रोजगार निर्मितीला वाव नसल्याने बाजारपेठ तुरळक व्यवसायांनी भरलेली आहे. 

आटपाट नगरचे राजे राज्याचा पंचवार्षिक अहवाल प्रजेला कधीच देत नाहीत. कामाचा अन् खर्चाचा हिशोब काही विरोधक व शत्रू मागत असतात पण साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करीत अन् आधुनिक 'चाणक्यनिती'चे डावपेच खेळत विरोधकांना गपगुमान केले जाते. लोकशाहीत प्रश्न विचारणे गुन्हा बनतो आणि मौन ठेवणे कर्तव्य! राज्यातील प्रजेसाठी शेकडो वर्षांपूर्वी एका तलावाची निर्मिती झाली, हे पेय प्रजेला शेती अन् पिण्यासाठी आवश्यक आहे. यंदा राज्यात आबादानी झाली...वरूणराजा अति प्रसन्न झाल्याने चहुबाजूला जलधारा कोसळल्या. तलाव तुडंब धरला, राज्याला पेय पोहचविणारे कूप लबालब झाले, पण प्रजेला पेय त्याच्या कुटीत येण्यासाठी 'सप्ताहाची' असे प्रतिक्षा. आधुनिक यंत्रे नसतांना तलावातील पेय कृषक (शेतकरी) यांच्या शेतजमीनी पर्यंत पोहचविण्यासाठी असलेली 'चारी' काही वर्षांपासून अदृश्य झाली...ती कुणी आणि का गेली हे प्रजेसाठी गुपित सत्य आहे. ऐवढेच नव्हे तर राजा अन् त्यांच्या राज घराण्याने देखील गावठाणात हात-पाय पसरले आहेत, पण सत्येपुढे शहाणपण चालत नसल्याने 'अतिक्रमण' राजाचे नव्हेच प्रजेचेच असते. 

प्रजेसाठी शेजारच्या राज्यातून एक गिरणम् पेय वाहणारी नलिका अन् योजना लक्षम् रुपयांची आटपाट नगरपर्यंत आली अन् अदृश्य योजनेने आटपाट नगरात चहूबाजूला चिखलच चिखल झाला. प्रजेतील बालक अन् कन्येसाठी असलेल्या 'शासकीय गुरूकुल'ची जागा ही जादूगराच्या हातात आली अन् तिथे नवा महाल उभा राहिला आणि ही सर्व राजाची कृपा...एकम अन् दुकम कोटि प्रजेसाठी राजाने 'बहुत ईमानदारी'त खर्च केल्याचे विरोधक ओरडून ओरडून सांगतात, पण राजा निश्चित आहे. कारण नेपाळसारखी 'जेन झी' (Gen Z / Generation Z) पिढी त्याच्या राज्यात नसल्याने असंतोष पसरणार नाही, अन् सत्ता कुणीही उलथवणार नाही ? याचा राजाला पूर्ण विश्वास आहे. 

आता आटपाट नगरच्या राजाचा एक मोठा कारनामा असा की, अनेकों वर्षांपूर्वी एक जागा 'निज गुरूकुल'साठी एका इसमाने दान केली. मोठे महाराजांकडून स्व-मुद्रांनी विक्रय केलेली मालमत्ता बालकांना ज्ञानप्राप्ती व्हावी, यासाठी दाढीवाल्या बाबांनी दान केली. गुरूकुलला दान केलेली अन् उरलेली मालमत्ता एकच असली तरी स्व मालकीच्या असलेल्या मालमत्तेतून दानशूराशी निगडीत प्रजेला प्रवेशाचा प्रश्न काही वर्षापासून उद्भभवला. नव मालकाने राजाशी संपर्क साधला...चहूबाजूंना मालकी हक्क असलेल्यांनी महाले उभारली, मला प्रवेशबंदी केली. महाराज प्रवेश द्या...राजे हूशार, कुणाचे दु:ख त्यांच्याशी पाहिले जात नाही. त्यांनी अभ्यास केला, स्थळ पाहणी केली अन् शौचालयांच्या शेजारून गावठानातून प्रवेशद्वार उभारण्यास परवानगी दिली गेली...राजांचे काहीच नाही पण समोरच्या मालमत्तेच्या मालकाने प्रवेशद्वार उभारण्याची परवानगी मिळाल्याने 'देशमुखी' थाटात राजाच्या हवाली 6 हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट केला. दोन - दोन हजारांचे तीन प्लॉट पण अद्याप महसुली लिखापढी थांबली कारण विरोधकांना कुणकुण लागली होती. पण राजांनी प्रजेसाठी गेल्या पंच कारभारात घाम गाळून, जीव ओतून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मिळालेली ती बक्षिसी पण विरोधक नालायक...त्यांना राजांना मिळालेली बक्षिसी अन् रोकड खटकत आहे. कागदांची जहाजे पाठवून राजांना चक्रव्युहात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण पेशवे यांनी आपल्याला वाचविण्यासाठी 'काका मला वाचवा' अशी आर्त हाक दिली होती, पण इथे हाक न देता 'काका' तोंडाची तलवार घेवून मैदानात...काका नेहमीच युध्दासाठी सज्ज, घोडा नेहमीच तैय्यार त्यामुळे 'काका मला वाचवा नव्हे तर काकापासून मला वाचवा' अशी हाक कधी कधी राजांना द्यावी लागते. 

राजांनी कुठेच चुकीचा कारभार केला नाही, नेहमीच प्रजेसाठी सज्ज...'काका'च्या डोक्यावर देखील सोनेरी मुकुट होता तेव्हा काकांचा 'राज्य कारभार' ही अतिशय धुतल्या तांदळाचा होता. लहान, मोठी अन् शेजारच्या राजधानीतून बादशहा, महाराज यांनी प्रजेसाठी पाठविलेले 'धन' फक्त आणि फक्त प्रजेसाठीच खर्च झाले. एक कवडीही खिशात नाही पण प्रजेसाठी दिवसरात्रं डोळ्यांत तेल घालून केलेल्या सेवेच्या बदल्यात अतिशय लहानसा मोबदला म्हणून 6 हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट अन् एकम अन् दुकम कोटि घेतले तर बिघडले कुठे ? पण विरोधकांना चैन पडेना...रोज नवीन शत्रू, कागदी शस्रे घेवून पाठविला जातो आणि राज्याची व राजाची, काकांची शांती भंग केली जाते. एकदा 'राजतिलक' झाला अन् वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्या प्रधान मंडळात राहत असल्याने संपूर्ण राज्य आमचेच...आम्ही सांगू तेच व्हावे, आम्ही बोट ठेवू ती आमचीच मालमत्ता, आम्ही आदेश दिला तर तो पाळलाच गेला पाहिजे असे राजा व काका वाटले तर त्यात गैर काय, पण विरोधकांना कुणाचे चांगलेच पाहिले जात नाही ना, ही मोठी शोकांतिका आहे. 

“6 हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट आणि कोट्यवधींचा मोबदला हा परिश्रमाचा मोबदला की सत्तेचा सौदा ?” माहीत नाही. पण राजा निर्दोषच…कारण सत्ता सुरक्षित आहे...राजा म्हणतो की, “मी चुकीचं काहीच केलेले नाही” कारण… प्रजा शांत आहे, तरुण पिढी निष्क्रिय आहे आणि सत्ता मजबूत आहे मग प्रश्न विचारायचा तरी कुणी ?

(टीप : ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती, जागा, गाव, शहर, ग्राम पंचायत, नगर परिषद, नेत्याशी संबंध नाही...कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही...ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही वास्तव व्यक्ती / घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा"...ही गोष्ट वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी काल्पनिक आहे, हे ध्यानात घ्यावे)

- फिरोज पिंजारी ( संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज, संस्थापक अध्यक्ष - न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, उपमुख्य पर्यवेक्षक - डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस)

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी