30 दिवसांत ठेकेदारावर कारवाई?
खोपोलीत आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण यशस्वी
मलनिस्सारण योजनेतील विलंब व गैरव्यवहाराविरोधात आंदोलन; प्रशासनाचे लेखी आश्वासन....
खोपोली / प्रतिनिधी : खोपोली शहरातील मलनिस्सारण योजनेतील कामांमध्ये झालेल्या विलंब व कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महाराष्ट्र संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी उपोषण मागे घेतले.
उपोषणादरम्यान खोपोली नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा पार पडली. या बैठकीत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी संबंधित कामांची सखोल चौकशी करून 30 दिवसांच्या आत दोषी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
नगरपरिषदेच्या आश्वासनानुसार पुढील उपाययोजना राबविण्यात येणार आहेत :
कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी
विलंबाबाबत चौकशी समितीची नियुक्ती
दोषी आढळल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
संपूर्ण प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण
प्रशासनाकडून स्पष्ट हमी मिळाल्यानंतर डॉ. रियाज पठाण यांनी उपोषण मागे घेतले. या आंदोलनामुळे मलनिस्सारण योजनेतील त्रुटींवर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आहे.
यावेळी डॉ. पठाण यांनी इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या पैशातून सुरू असलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दिलेले आश्वासन 30 दिवसांत पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या वेळी खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी सचिन हिरे, नगर परिषद अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून मलनिस्सारण योजनेतील त्रुटींवर लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Post a Comment