रायगड जिल्ह्याचे ॲड. प्रल्हाद बट्टेवार यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर...

 


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रल्हाद विश्वनाथ बट्टेवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बट्टेवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार शुक्रवार, दि. 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता ‘फाउंटन इन (लिमोनेट लीला)’ पोस्ट – नडगाव तर्फे बीरवाडी, मुंबई-गोवा महामार्गावरील न्यू सावित्री ब्रिजजवळ, ता. महाड, जि. रायगड येथे आयोजित स्वराज्यभुमी रायगड गौरव संमेलन 2026 मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभात अभिनेते अजय तपकिरे यांच्या शुभहस्ते ॲड. बट्टेवार यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशन रायगड (भारत) आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲड. प्रल्हाद बट्टेवार हे सध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत असून ते अखिल भारतीय मातंग संघ तसेच भारतीय बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी एम.ए. (इतिहास), एम.ए. (राज्यशास्त्र), एल.एल.बी., एल.एल.एम. (मानवी हक्क), डि.एल.एल. अँड एल.डब्ल्यू. तसेच मुंबई विद्यापीठातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार’ या विषयातील पी.जी.डी. शिक्षण पूर्ण केले आहे.

बट्टेवार हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य मातंग समाज सेवा संघ तसेच क्रांतीसम्राट स्व. डॉ. बाबासाहेब गोपले विचार मंच यांच्याशीही ते संलग्न आहेत. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या बट्टेवार यांनी १९८५ साली अवघ्या १३ व्या वर्षी क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात सहभागी होत समाजकार्यात पहिले पाऊल टाकले.

१९९० पासून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. पुढे २००३ पासून अखिल भारतीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये अखिल भारतीय मातंग संघ खोपोली शहर सेक्रेटरी, २००५ मध्ये रायगड जिल्हा उपाध्यक्ष, २०१३ मध्ये जिल्हा सेक्रेटरी अशी विविध पदे त्यांनी सांभाळली. त्यांच्या कामाची दखल घेऊन २०२४ मध्ये क्रांतिज्योती कुसुमताई यांनी त्यांना रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलन, मंत्रालयावर मोर्चे, तसेच नागपूर अधिवेशनावर मातंग समाजाचा मोर्चा अशा अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजातील न्याय्य हक्कांसाठी ते सातत्याने लढत राहिले आहेत.

खोपोली शहरात मातंग समाजासाठी ‘अण्णाभाऊ साठे सभागृह’ उभारण्यासाठी त्यांनी २००५ पासून खोपोली नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर २०१३ साली हे सभागृह बांधून पूर्ण झाले. या सभागृहाचे भूमिपूजन ते हस्तांतरण सोहळा क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले, नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर आणि आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला.

२००६ पासून खोपोली शहरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली असून आजही ती उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच विविध महापुरुषांच्या जयंती आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन ते सातत्याने करत असतात.

सामाजिक कार्याबरोबरच ते गरीब व गरजू नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन देणे, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करणे अशी कामेही करत असतात. कामगार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून सचिन अहिर प्रणित कामगार संघटनेचे कामगार प्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी