जिल्हा परिषदेत खालापूर तालुक्यात संमिश्र निकाल
* जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक 2026
* खालापूर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व
* जि.प.मध्ये भाजप, उबाठा, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी महत्त्वाच्या जागांवर यश
खालापूर / मानसी कांबळे :- जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच केवळ खालापूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडल्यापासून उमेदवार, नेते, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागून राहिले होते. खालापूर पंचायत समितीवर कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार ? निकाल जाहीर होताच या प्रश्नाचे चित्र स्पष्ट झाले असून तालुक्यात भाजप, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट वर्चस्व न मिळाल्याने आगामी काळात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
* पंचायत समिती निवडणुकीत संमिश्र यश :- खालापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या जागांवर विविध पक्षांनी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. चांभार्ली - अर्चना भोईर (भाजप), रिस - कृष्णा पारंगे (भाजप), चौक - कमळ राम भस्मा (उबाठा), हाळ खुर्द - रितेश बळीराम जाधव (शिवसेना शिंदे गट), वाशिवली - गौरी महादेव गडगे (भाजप), सावरोली - प्रमिला महेश पाटील (उबाठा), खानाव - रघुनाथ (भाई) शिंदे (शिवसेना शिंदे गट), आत्करगाव - देवयानी अजित देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) या निकालांवरून भाजप, उबाठा व शिंदे शिवसेना यांना प्रत्येकी महत्त्वाच्या जागांवर यश मिळाल्याचे स्पष्ट झाले असून पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय गणिते रंगू लागली आहेत.
* जिल्हा परिषदेत प्रत्येक पक्षाचा वाटा :- जिल्हा परिषद गटांमध्येही विविध पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. 15 चौक जिल्हा परिषद गट वैशाली विष्णू खैर (शिवसेना उबाठा), 16 वासांबे जिल्हा परिषद गट नेहा भूषण पारंगे (भाजप), 17 सावरोली जिल्हा परिषद गट संतोष गणेश बैलमारे (राष्ट्रवादी काँग्रेस), 18 आत्करगाव जिल्हा परिषद गट रेश्मा राजेश पाटील (शिवसेना शिंदे गट) या निकालांमुळे खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतही कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नसून चारही प्रमुख पक्षांना प्रत्येकी एक-एक गट मिळाल्याने तालुक्याच्या राजकारणात संतुलनाचे चित्र दिसून येत आहे.
* चौक, वासांबे, सावरोली व आत्करगाव गटांत रंगला राजकीय संघर्ष :- चौक, वासांबे, सावरोली व आत्करगाव या प्रमुख गटांत यावेळी चुरशीचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. चौक गटात उबाठा गटाने जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही ठिकाणी आपली उपस्थिती मजबूत दर्शवली. वासांबे गटात भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. सावरोली गटात राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा गटाने प्रत्येकी एक जागा मिळवली.
आत्करगाव गटात शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक जागा पटकावली.
* सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग :- निकाल जाहीर होताच तालुक्यात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. फटाके, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या पोस्टर्समुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, स्पष्ट बहुमत कुणालाही न मिळाल्याने पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी पुढील काही दिवसांत राजकीय वाटाघाटी, चर्चा आणि संभाव्य युती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
* विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवण्याचे आव्हान :- संमिश्र निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली असली, तरी जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्याच्या विकासासाठी कोणती आघाडी स्थापन होते आणि पुढील नेतृत्व कोणाकडे जाते, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment