विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करा : बी. एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन

 


व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड जिल्हा / प्रतिनिधी :-भारतीय बौध्द महासभा यांच्या माध्यमातून विविध प्रकारची २४ शिबिरे आयोजित केली जातात. त्यापैकी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिर हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने सातत्याने वाचन करून स्वतःची बौद्धिक उन्नती साधावी. विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांनी केले. तसेच जिल्हा शाखेच्या कार्याचे त्यांनी कौतुकही केले.


महासभेच्या जिल्हा शाखा (उत्तर) यांच्या वतीने मोहपाडा येथे रविवारी (दि. २२) व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, सभासद नोंदणी मोहिमेचे उद्घाटन आणि जनगणना २०२६ संदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. यावेळी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. एस. एस. वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे, सरचिटणीस प्रकाश सोनावळे, कोषाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, सभासद आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये समयसूचकता असणे आवश्यक आहे. नेतृत्व धोरणात्मक निर्णय घेणारे आणि सर्वांना संघटित ठेवणारे असावे. सर्वांप्रती मैत्रीभाव जोपासणे गरजेचे आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून दूरदृष्टीने काम केल्यास ते समाजासाठी प्रेरणादायी ठरते. नीतिमत्ता, सामाजिक बांधिलकी, प्रभावी वक्तृत्व, कल्पकता आणि कार्यक्षम दूरदृष्टी या गुणांमुळे नेतृत्वगुण अधिक सक्षम होतात व व्यक्तिमत्त्व विकासाला बळकटी मिळते, असे त्यांनी नमूद केले.


यावेळी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. एस. एस. वानखेडे यांनी उद्दिष्टपूर्ती, संकल्प, क्षमता, गतिशीलता आणि सुसंघटन या विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनीही उपस्थितांना संबोधित करत संघटनात्मक बळकटीसाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी