सुभाषनगर येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
* रमाई महिला मंडळ व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचा पुढाकार ; धम्मपूजा, प्रतिमापूजनाने कार्यक्रम संपन्न
खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर रमाई महिला मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांच्या संयुक्त आयोजनातून डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवन, सुभाषनगर येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई, डॉं. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सुगंध पूजनाने झाली. उपासिका भावना ओव्हाळ यांनी विधिवत धम्मपूजा करून उपस्थितांना धम्मविचारांचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या त्यागमय जीवनाचा उपस्थित महिलांनी भावपूर्ण शब्दांत गौरव केला.
कार्यक्रमास गीता कांबळे, जयश्री गायकवाड, गीता मर्चंडे, शांता कवडे, कविता गायकवाड, प्रभा गवळे, स्वाती गिलबिले, राजश्री गिलबिले, सविता गिलबिले, नीलम कोळी, लता जाधव, पाटील ताई, सोनावणे ताई, लता खेडकर यांच्यासह सुभाषनगर परिसरातील महिला ग्रामस्थ व बचत गटातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रमाबाई आंबेडकर (7 फेब्रुवारी 1898 - 27 मे 1935) या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी असून त्या थोर समाजसुधारक म्हणून ओळखल्या जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि दारिद्र्यात जीवन जगत असतानाही त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सामाजिक चळवळींसाठी आयुष्यभर त्याग केला.
संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलत त्यांनी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. त्यामुळेच त्यांना समाजात ‘माता रमाई’ या नावाने आदराने संबोधले जाते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये सामाजिक जाणिवा, समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि धम्ममार्गांचा संदेश पोहोचविण्यात आला. माता रमाई यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन महिलांनी स्वाभिमानाने उभे रहावे, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.

Comments
Post a Comment