खालापूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना अद्याप न्याय नाही

 

* डोणवत येथील शेतजमिनींवर जाण्यास अडथळे ; भीम आर्मीकडून ‘रस्ता परिषद’ घेऊन मोठ्या आंदोलनाची तयारी


खालापूर / सुधीर देशमुख :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावातील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीवर जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळे निर्माण होत असल्याने शेतकरी प्रचंड अन्यायाच्या छायेत जगत आहेत. कायदेशीर मालकी असूनही नामवंत कंपनी गोदरेज अँड बॉईज यांच्या व्यवस्थापनाकडे वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतीत जाण्याचा मार्ग उपलब्ध होत नसल्याने ही बाब अत्यंत गंभीर आणि शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

* निवेदने, आंदोलने करूनही प्रशासनाची उदासीनता :- या प्रश्नावर आदिवासी शेतकऱ्यांनी व भीम आर्मी संघटनेने वेळोवेळी आंदोलने, निवेदने व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत असून, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

* कोकणात प्रथमच ‘रस्ता परिषद’ :- या पार्श्वभूमीवर भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून येत्या चार ते पाच दिवसांत शेतकऱ्यांना घेऊन कोकण विभागात प्रथमच ‘रस्ता परिषद’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या रस्ता परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून, त्यानंतर मोठ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

* राज्यस्तरीय नेतृत्वाची उपस्थिती अन् आंदोलनाची घोषणा :- या पत्रकार परिषदेस भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, मुख्य महासचिव दीपक भालेराव तसेच नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रितेश पवार उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडून लवकरच व्यापक आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

* आदिवासी शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय थांबवणारच - राजेश चव्हाण :- भीम आर्मीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश श्याम चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, डोणवत गावातील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतीत जाण्यास रोखले जात आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर भीम आर्मीच्या माध्यमातून मोठे आंदोलन छेडण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी