राष्ट्रीय विज्ञान दिन
भारतामध्ये दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महान भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ हा दिवस पाळला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी त्यांनी “रमण परिणाम” (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानामुळे मानवी जीवनात अमूलाग्र बदल घडून आले आहेत. विविध आधुनिक तंत्रज्ञान, संप्रेषण साधने, आरोग्यसेवा, वाहतूक व्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमुळे आपले जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर झाले आहे. मोबाईल तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, परिसंवाद आणि व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची प्रेरणा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश असतो.
विज्ञानामुळे समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि चुकीच्या समजुती कमी होण्यास मदत झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे समाज अधिक प्रगत, जागरूक आणि विवेकी बनला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील घड्याळाचा गजर, घरगुती उपकरणे, संगणक, इंटरनेट यांसारखी साधने ही विज्ञान प्रगतीची जिवंत उदाहरणे आहेत.
एकूणच, विज्ञान हे देशाच्या प्रगतीचे भक्कम आधारस्तंभ आहे. विज्ञानामुळेच राष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने घडवली प्रगती.
विज्ञानाने दिला नवा ध्यास, विज्ञानाने झाला देशाचा विकास!
— प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
मो. ९६०४७९७३१६

Comments
Post a Comment