खोपोली - वासरंग तांबडीतील प्राचीन परशुराम मंदिराचा जिर्णोद्धार
* स्वयंसेवकांचा प्रेरणादायी उपक्रम : श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान व गोवंश सुरक्षा समिती खालापूर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन
खालापूर / सुधीर देशमुख :- खोपोली येथील वासरंग - तांबडी परिसरातील प्राचीन श्री भगवान परशुराम मंदिराचा जिर्णोद्धार, स्वच्छता व संवर्धनाचा उपक्रम श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान, गोवंश सुरक्षा समिती खालापूर आणि वासरंग - तांबडी ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गडकोट स्वच्छता, संवर्धन व ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याचे कार्य करणाऱ्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानने या उपक्रमातून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
* गडदुर्ग, बारव, विरगळ, सतीशिळा जतनाचे सातत्यपूर्ण कार्य :- श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे गडकोटांवरील स्वच्छता, गडदुर्गांचे संवर्धन, ऐतिहासिक मंदिरे, बारव, विरगळ व सतीशिळा यांसारख्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे कार्य करीत आहे. एकविरादेवी, आळे फाटा येथील रेडा समाधी, साजगाव, कराडे, मोहोपाडा आदी ठिकाणी जाऊन गडदुर्ग, बारव व भुईकोटांची डागडुजी, साफसफाई व संवर्धनाची कामे त्यांनी केली आहेत.
* मंदिर परिसरात अवैध प्रकार थांबवून धार्मिक वातावरणाची पुनर्स्थापना :- वासरंग - तांबडी येथील श्री भगवान परशुराम मंदिर परिसरात यापूर्वी अवैध दारू पिणे, जुगार खेळणे व पार्ट्यांचे प्रकार सर्रास सुरू होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी गोवंश सुरक्षा समिती खालापूर यांच्या माध्यमातून महिन्याभरापूर्वी दर रविवारी साप्ताहिक आरती सुरू करण्यात आली. त्यासोबतच मंदिर परिसरातील प्लास्टिक, दारूच्या बाटल्या व इतर कचरा साफ करून परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित करण्यात आला. जीर्ण अवस्थेत असलेल्या मंदिराच्या चौथऱ्याची दुरुस्ती व आवश्यक तेथे संवर्धन करण्यात आले.
* मंदिर प्राचीन असण्याची शक्यता :- श्री भगवान परशुराम मंदिर किती वर्षांपूर्वीचे आहे, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नसल्या तरी मंदिराचा मूळ चौथरा व कळसाखालील भिंती प्राचीन दगडी बांधकामातील असल्याचे दिसून येते. यावरून हे मंदिर प्राचीन काळातील असावे, असा अंदाज श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.
* स्वतःच्या खर्चाने समाजासाठी सेवा :- श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानमध्ये दोनशेहून अधिक महिला व पुरुष स्वयंसेवक कार्यरत असून बहुतेक सर्वजण नोकरदार आहेत. आठवड्यातील सुट्टीचा दिवस वैयक्तिक कामांसाठी न वापरता समाजासाठी, स्वच्छता व संवर्धन मोहिमांसाठी खर्च करणे ही त्यांची विशेष बाब आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असते, त्या ठिकाणी जाण्याचा खर्चही स्वयंसेवक स्वतःच्या खिशातून करतात.
* 35 - 40 स्वयंसेवकांचा सहभाग :- या मोहिमेत श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानचे सुमारे 35 ते 40 स्वयंसेवक, गोवंश सुरक्षा समिती खालापूरचे कार्यकर्ते तसेच वासरंग - तांबडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून मंदिर परिसराला पुन्हा धार्मिक, स्वच्छ व पवित्र स्वरूप प्राप्त झाले आहे.

Comments
Post a Comment