खोपोली नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या भिंतीवर दात्यांच्या नावाचे फलक पूर्ववत करा ...
राष्ट्रवादीच्या सौ. जैबुनिसा शेख यांची नगरपालिकेकडे मागणी
खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखला जावा आणि नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी जागा दान देणाऱ्या दात्यांच्या नावाचे फलक नवीन इमारतीवर पुन्हा लावण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा सौ. जैबुनिसा हामीद शेख यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दात्यांचे योगदान
खोपोली नगर परिषदेची स्थापना १ जुलै १९७१ रोजी झाली. त्यानंतर १९७६ मध्ये बाबू शेठ मुल्ला हे थेट जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष ठरले. शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. याच कुटुंबातील दाऊद साहेब गुलाब मोहम्मद मुल्ला आणि मोहम्मद इस्माईल मुल्ला यांनी १९५६ साली दवाखान्यासाठी ३२ गुंठे जागा आणि ३,००० रुपये रोख रक्कम देणगी म्हणून दिली होती.
नेमका विषय काय?
जुन्या दवाखान्याच्या इमारतीवर या दात्यांच्या नावाचे फलक अनेक वर्षांपासून होते. नव्याने भव्य दवाखाना इमारत बांधल्यानंतर जुने फलक काढण्यात आले, परंतु नवीन इमारतीवर ते अद्याप लावण्यात आले नाहीत.दवाखान्याचे लोकार्पण जवळ आले असतानाही फलक न लावल्याने सौ. जैबुनिसा शेख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
लोकप्रतिनिधींची सकारात्मक भूमिका
या प्रश्नी गांभीर्याने दखल घेत सौ. जैबुनिसा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक डॉक्टर सुनील पाटील यांनाही पत्र दिले असून, हा मुद्दा नगरपालिकेच्या बैठकीत मांडण्याची विनंती केली आहे. नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलक लावण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
"ज्या दानशूर व्यक्तींनी शहराच्या आरोग्यासाठी आपली जमीन दिली, त्यांचे नाव नवीन इमारतीवर असणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. मला विश्वास आहे की नगराध्यक्ष आणि अधिकारी माझ्या शब्दाचा मान राखून हे फलक सन्मानाने पुन्हा लावतील." असा विश्वास सौ. जैबुनिसा हामीद शेख (जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल) यांनी व्यक्त केला आहे.
समाजाच्या प्रत्येक बारीक प्रश्नावर आणि इतिहासाच्या जपणुकीवर लक्ष ठेवून असल्यामुळे सौ. जैबुनिसा शेख यांची ओळख मुस्लिम समाजातील एक 'फायर ब्रँड' नेत्या म्हणून निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment