सुभाषनगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर
* महिलांच्या तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : हुमाना पीपल टु पीपल इंडिया, मर्क स्पेशालिटीज यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृतीचा उपक्रम
खोपोली / मानसी कांबळे :- हुमाना पीपल टु पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई - खोपोली) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट लीडर विठ्ठल ठाकरे यांच्या पुढाकाराने सुभाषनगर गणपती मंदिर परिसरात शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, नेत्र तपासणी तसेच महिलांसाठी गर्भाशयमुख कॅन्सर (Cervical Cancer) तपासणी करण्यात आली. विविध आजारांवरील प्राथमिक तपासणी व तज्ज्ञ डॉंक्टरांकडून मार्गदर्शन देण्यात आले. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्मेही उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमात डॉं. तृप्ती पोयरेकर (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), डॉं. सिमरन थोरात (कॅंन्सर तज्ज्ञ), डॉं. निधी अग्रवाल, डॉं. योजना तळपडे यांनी महिलांची सविस्तर तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट (नेत्र रुग्णालय, पनवेल) यांच्या वतीने नेत्रतज्ज्ञ अश्विनी बोडके व मालिका त्तेवर यांनी डोळ्यांची तपासणी केली.
प्रोजेक्ट लीडर विठ्ठल ठाकरे, हेल्थ अॅक्सिलरेटर सरिता पेंदाम, कम्युनिटी मोबिलायझर रविना गायकवाड व ॲंड. प्रल्हाद बट्टेवार यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आशा सेविका योगिता मुके, श्रावणी जंगम, मुस्कान सय्यद, वृषाली कांबळे, माधवी कोचुरे तसेच आरोग्य सेविका मुक्ता सूर्यवंशी, ए. साठे यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक डॉं. सुनील पाटील यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करीत ग्रामस्थांना नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः तपासणी करून नागरिकांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲंड. प्रल्हाद बट्टेवार यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, अशोक गिलबिले, संतोष गायकवाड, पत्रकार मानसी कांबळे व आशा सेविका योगिता मुके यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
हुमाना पीपल टु पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने खोपोली परिसरात गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. ‘प्रकल्प निरामया’ अंतर्गत महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य गट तयार करून दरमहा प्रशिक्षण, गृहभेटी, जनजागृती रॅली, मोफत आरोग्य शिबिरे तसेच किशोरवयीन मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप असे उपक्रम राबवले जात आहेत.
सुभाषनगरातील या शिबिरामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून भविष्यातही अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment