पळसदरीजवळ रुळांवर भडकली आग...
खोपोली - सीएसएमटी लोकल थांबवून मागे वळवली
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोलीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सीएसएमटी लोकलच्या प्रवाशांचा आज दुपारी काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी खोपोली रेल्वे स्थानकातून रवाना झालेली लोकल पळसदरी स्थानकाच्या आधी पोहोचण्याच्या मार्गांवर असताना रुळांच्या कडेला असलेल्या सुक्या गवताला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीचे लोंढे ट्रॅकपर्यंत येऊन धुराचे मोठे लोट पसरले.
* मोटरमनची तत्परता, संभाव्य अपघात टळला :- समोर पसरलेली आग आणि दाट धूर पाहून मोटरमनने प्रसंगावधान राखत तातडीने लोकल जागीच थांबवली. पुढील धोका लक्षात घेऊन लोकलला पुढे न नेता सुरक्षित अंतरावरून मागे वळविण्यात आले. मोटरमनच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अपघात टळला असला तरी लोकलमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
* आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट :- ही आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कुणी जाणीवपूर्वक आग लावली का ? आसपासच्या शेतात सुके गवत जळतांना ठिणगी रुळांपर्यंत पोहोचली का ? की हा निव्वळ अपघात आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
* वाहतुकीवर परिणाम ; प्रवाशांचा मनस्ताप :- या आगीमुळे खोपोली - कर्जत मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. काही लोकल गाड्या उशिराने धावल्या तर काहींच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. परिणामी कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
* सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह :- रेल्वे मार्गांलगत मोठ्या प्रमाणावर सुक्या गवताचे जाळे वाढले असून, उन्हाळ्यात अशा घटनांचा धोका अधिक वाढतो. यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने ट्रॅकच्या आजूबाजूची स्वच्छता, सुक्या गवताची साफसफाई आणि आग प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेने रेल्वे सुरक्षेतील त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, हीच प्रवाशांची अपेक्षा आहे.

Comments
Post a Comment