रायगडमधील लाल बावटा उतरला!

 



* शेकापच्या बालेकिल्ल्यांचे राजकीय अस्तित्व ढासळले!

* जिल्हा परिषदेत शून्य जागा, अलिबाग पंचायत समितीही हातातून गेली

* सोनेरी काळातून अस्तित्वाच्या लढाईपर्यंतचा आजचा प्रवास

रायगड / सुधीर देशमुख :- रायगड जिल्ह्यात तब्बल तीन दशके राजकारणावर वर्चस्व गाजविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) प्रभाव आता इतिहासजमा होत असल्याचे चित्र अलीकडील निवडणूक निकालांतून स्पष्ट झाले आहे. एकेकाळी पनवेल, अलिबाग, पेणसारख्या प्रमुख मतदारसंघांत आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रावर लाल बावटा फडकविणाऱ्या शेकापला आज जिल्हा परिषदेच्या 59 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. 1965 पासून ताब्यात असलेली अलिबाग पंचायत समितीही पक्षाला राखता आलेली नाही. शेकापचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अलिबाग - मुरूड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या नऊच्या नऊ जागा शिवसेनेने जिंकत शेकापच्या अधोगतीवर शिक्कामोर्तब केला आहे. याबाबत एस. एम. देशमुख यांनी आपल्या लेखाबाबत शेकापचा इतिहास मांडतानाच अधोगतीची कारणे मांडत पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले आहे. 


* 1994 ते 2012: शेकापचा ‘सोनेरी काळ’ :- 1994 ते 2012 या 18 वर्षांच्या कालखंडात रायगडमधील बहुतेक सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात होती. पनवेल, अलिबाग, पेण येथील आमदार-खासदार शेकापचे असायचे. जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी संस्था आणि सहकार चळवळीवर पक्षाची पकड होती. याच बळावर जयंत पाटील यांना अनेकदा विधान परिषदेवर पाठविण्यात आले. मजबूत कार्यकर्ते, संघटनात्मक ताकद आणि सहकारातील वर्चस्वामुळे प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये शेकापची कायम धास्ती होती.


* आजची वस्तुस्थिती : अस्तित्वासाठीची झुंज :- आज मात्र चित्र उलटे झाले आहे. पनवेल, उरण, पेण या भागांत शेकापचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. अलिबाग नगरपालिका शेकापकडे असली तरी तो विजय पक्षाचा नसून प्रशांत नाईक यांच्या व्यक्तिगत करिष्म्याचा असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. पक्ष संघटनात्मक ताकदीपेक्षा व्यक्तिकेंद्री प्रभावावर मिळालेला हा विजय शेकापच्या एकूण अधोगतीचे द्योतक मानला जात आहे.


* अधोगतीची कारणे : नेतृत्वाचा अहंकार ते कुटुंबकेंद्री राजकारण :- शेकापच्या पानिपतामागे अनेक कारणे पुढे येत आहेत. त्यात नेतृत्वाचा अहंकार, आत्मकेंद्रीपणा, एकचालकानुवृत्ती, इतरांना गृहीत धरण्याची वृत्ती आणि कुटुंबकेंद्री राजकारण यांचा समावेश आहे. एकामागून एक निष्ठावान शिलेदार पक्ष सोडून जात असतांना नेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही. “जाऊ द्या, फरक पडत नाही” हा अहंकार इतका टोकाला गेला की सख्खे भाऊही दुरावले. परिणामी पक्षसंघटनाच ढासळली.


* पाटील घराण्याचेही राजकीय स्थान संपुष्टात :- प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांनी ज्या पक्षाची पायाभरणी केली, त्या पक्षाची रायगडमधील अवस्था आज अत्यंत दुर्दैवी आहे. पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती आज कुठल्याही सत्तास्थानावर नाही. खासदार-आमदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, नगरसेवकही नाही. पक्ष संपुष्टात आला आणि पक्ष चालवणारेही सत्तेच्या बाहेर फेकले गेले, हे राजकीय वास्तव आहे.


* समाजवादी चळवळीचे अपयश ? :- शेतकरी व कामगारांच्या हक्कांची भाषा करणारा शेकाप अशा पद्धतीने संपुष्टात यावा आणि समाजवाद - साम्यवादाचा वारसा असलेल्या रायगडमध्ये जातीय राजकारण बळवावे, ही बाब राजकीयदृष्ट्या शोकांतिका असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. देशभरात अनेक चळवळी नेतृत्वाच्या अहंकारामुळे, फाजील आत्मविश्वासामुळे किंवा सत्ताधाऱ्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे मोडीत निघत असल्याचे चित्र आहे.


* फेसबुक पोस्ट नव्हे, चळवळ उभी राहावी लागते :- धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारांचा वारसा जपायचा असेल, तर केवळ सोशल मीडियावर टीका-टिप्पणी करून चालणार नाही. शेकापसारखे वैचारिक पक्ष टिकले तरच चळवळी टिकतील, असा सूर राजकीय विश्लेषक लावत आहेत. “आत्मचिंतन करा” असा सल्ला देण्याची वेळही आता निघून गेली असून, शेकापचे असे संपुष्टात येणे हे केवळ एका पक्षाचे नव्हे, तर एका वैचारिक चळवळीचे अपयश असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी