खोपोलीत ‘बहुजन संकल्प’ व ‘रायगड संकल्प’चा 11 वा वर्धापन सोहळा उत्साहात

 

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळासह विविध सामाजिक संस्थांचा विशेष सन्मान

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगरीत सामाजिक जाणिवा, अभिमान आणि प्रेरणादायी कार्याचा संगम अनुभवायला मिळाला. साप्ताहिक बहुजन संकल्प व रायगड संकल्प न्यूज यांच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळा खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाला नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, नगरसेवक डॉं. सुनील पाटील, ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मोरे, खुशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मोनिका कांबळे तसेच नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक - नगरसेविका आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.


* सामाजिक कार्याला मानाचा मुजरा :- या सोहळ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळ, खोपोली यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळाचे अध्यक्ष व अखिल भारतीय मातंग संघ रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष Adv. प्रल्हाद बट्टेवार व सहकारी.. यांचा सत्कार करण्यात आला. प्रबोधन, वंचित घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याबद्दल मंडळाच्या कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. यासोबतच युवा पँथर ग्रुप, मुस्लिम बेलदार समाज, आई माऊली सामाजिक संस्था आदी संघटनांचेही उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन विशेष गौरव करण्यात आला.


* समाजभान जपणाऱ्या पत्रकारितेचा गौरव :- बहुजन संकल्प व रायगड संकल्प या साप्ताहिकांनी गेल्या 11 वर्षांत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर निर्भीड पत्रकारिता करण्याचा वारसा जपला आहे. या सातत्यपूर्ण कार्यामुळे या साप्ताहिकांनी खोपोली व परिसरात विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या पत्रकारितेच्या प्रवासाचा गौरव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्याचा गौरव केल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांना सन्मानित केल्याने त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असेही मान्यवरांनी नमूद केले. खोपोलीत पार पडलेला हा वर्धापन सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी