Tuesday, July 8, 2025

विकासाच्या दिशेने तमनाथची वाटचाल

 आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन



जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रम उत्साहात संपन्न.


 कर्जत/ नरेश जाधव :- सोमवार, दिनांक ७ जुलै 2025 रोजी जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तमनाथ येथे शाळा दुरुस्ती, नवीन क्रीडांगण आणि पाणीपुरवठा यांसह विविध विकासकामांचे उद्घाटन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या दुरुस्तीचे काम, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप आणि पाणीपुरवठ्यासाठी बोअर व इलेक्ट्रिक वॉटर पंप या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शाळेच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी क्रीडांगणाचे उद्घाटन हे विशेष महत्त्वाचे ठरले.


या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की,

"तमनाथ येथील जिल्हा परिषद शाळा ही खरोखरच आदर्श ठरेल अशी वाटते. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळेच ही शाळा विशेष बनते. अशा शाळांची संख्या तालुक्यात वाढावी यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू. शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न सुरुच राहील."

"तमनाथ हे केवळ एक गाव नाही, तर पुढील काळात आदर्श ग्राम म्हणून नावारूपाला येईल, अशी मला खात्री वाटते. आणि या सर्व प्रगतीत जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांचे योगदान अमूल्य आहे."

"आज त्यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. जिल्हा प्रमुखाने खांद्याला खांदा लावून केलेले काम खरोखरच प्रेरणादायी आहे."


सदरील कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्यांचे वाटप करून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले.


या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, तालुकाप्रमुख सुदाम पवाली, विभागप्रमुख सुनील ठाकूर, जिल्हा परिषद संघटक भगवान घोडविंदे, युवा सेनेचे प्रतिनिधी संदीप भोईर, वरई ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश फराट, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष सुनील गोगटे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र भोईर, सदस्य महेंद्र भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीराम भालिवडे, युवा सेनेचे पदाधिकारी रुपेश भोईर, माजी उपसरपंच (बीड ग्रामपंचायत) सुनील घरत, शिरसे ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश देशमुख, महिला तालुकाप्रमुख रेशमा म्हात्रे, माजी सदस्य सुमन भोईर, शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती भोईर, शिवसैनिक कार्यकर्त्या मनीषा दळवी आणि अरुणा भोईर यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home