कर्जत - खालापूरातील अवैध उत्खनन व भरावाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ?
निवेदन, अर्जाद्वारे माहिती देण्यास टाळाटाळ ?
भ्रष्टाचाराच्या गंगेत बरबटलेल्या लोकसेवकांची चौकशी करा !
पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांच्याकडून आंदोलनाचा इशारा
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अवैध उत्खनन व भराव करून शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडविल्याचे निदर्शनास येत असतांना देखील कर्जत-खालापूर तालुक्यात महसूल विभागाकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवून शासनालाच चुना लावणाऱ्या भू-माफियांवर कर्जत-खालापूरमधील महसूल अधिकारी एवढे मेहरबान का झाले आहेत ? याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. महसूलमधल्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीनेच रॉयल्टीपेक्षा दहा, वीस तर काही महाबहाद्दरांनी जवळपास तीस पट जादा उत्खनन व भराव केल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री सचिवालय व वरिष्ठ कार्यालयातून पत्राद्वारे अर्जदाराला माहिती देण्यात यावी असे पत्र महसूल विभागला देण्यात आले असतांना तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तहसीलदार माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केला आहे.
कर्जत तालुक्यात बार्णे येथील सर्व्हे नं. 13/2 व 13/3 या जागेत गेल्या काही महिन्याआधी भला मोठा उत्खनन व भराव करण्यात आला 100 ब्रासची रॉयल्टी आणि 1500 ते 2000 ब्रास उत्खनन होवून भराव करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 'इन कॅमेरा' पंचनामा करावा व रॉयल्टीपेक्षा जास्त उत्खनन व भराव केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधिताला बिनशेती करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी तक्रार पत्रकार राजेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, महसूल मंत्री, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी, नगर विकास कार्यालय अलिबाग, कर्जत प्रांताधिकारी, कर्जत तहसिलदार आदींना 12 जून 2025 रोजी केली आहे. अंदाजे दोन महिने उलटून ही अद्याप याबाबत कोणतीच कार्रवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकरणात तहसीलमधील अनेक वरीष्ठ अधिकारी तक्रारदार व संबंधित व्यक्तीमध्ये तह घडवून आणत असल्याचे दिसून येत आहे. शासनाची लाखों रुपयांची रॉयल्टी बुडत असतांना तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी नेहमीच रॉयल्टी न भरणाऱ्या व्यक्ती व भू माफिया यांची बाजू घेत असतात, यामधील नेमके गौडबंगाल समजून येत नाही. शासनाचे लाखोंचे नुकसान होत असताना तहसील कार्यालय रॉयल्टी चोरी करणाऱ्यास पाठीशी का घालत आहे, याचे उत्तर देण्यात यावे. तलाठी, मंडळ अधिकारी हे आपल्या कामात कसूर करीत असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. जर त्या ठिकाणी फक्त 100 ब्रास उत्खनन व भराव झाला असेल तर आमची कोणतीच तक्रार राहणार नाही पण आपण पत्रकार यांच्यासमोर 'इन कॅमेरा' पंचनामा करावा अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा पत्रकार राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.
ज्या जागेत भराव करण्यात आले त्याचे फोटो देखील अधिकाऱ्यांना दाखवून देण्यात आले. पण कार्रवाई व माहिती देण्याची हिंमत न करता अर्जदार पत्रकारालाच 'तारीख पे तारीख' देत माहिती देण्यास तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पत्रकार जाधव यांनी केला आहे. तसेच भू माफियांनी एका भुरट्याला महाप्रसाद देऊन तोंड बंद केले असल्याचे समजते. महसूल मधल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि रॉयल्टीच्या काही पट उत्खनन करायचे. यातून कोट्यवधीची माया जमवायची, असेच प्रकार घडत असून महसूलचे अधिकारीच चिरीमिरीत अडकल्याने अनधिकृतरित्या उत्खनन व भराव माफियांचे फावल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी समक्ष येवून पाहणी करावी व संबंधित लोकसेवकांवर कारवाई करावी, कारवाई न झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात महसूल विभागाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home