अनधिकृत माती भरावावरची 'इन-कॅमेरा' चौकशी करा
पत्रकार राजेंद्र जाधव यांची मागणी : बार्णे गावाच्या हद्दीतील स. नं. १३/२ व १३/३ जागेतील भरावावर ४९ लाख ३८ हजार ५११ रुपयाची महसूलची नोटीस ?
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी भरमसाठ उत्खनन व भराव राजरोसपणे करण्यात येत आहे. भू - माफियांकडून या उत्खनन व भरावासाठी नाममात्र रॉयल्टी भरून महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर सर्रासपणे डल्ला मारला जात आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, निवासी नायब तहसीलदार (RNT), तहसिलदार भू माफियांनी केलेल्या उत्खनन व भरावाची चौकशी करण्यासाठी कानाडोळा करीत तक्रारदारास फिरवाफिरवी करीत उडवाउडवीची उत्तरे देत पंचनामे करण्यास व केलेल्या पंचनामे यांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
तक्रारदार पत्रकार राजेंद्र जाधव यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीची दखल घेऊन कर्जत तालुक्यातील बार्णे गावाच्या हद्दीत मागील काही महिन्याआधी सर्व्हे नं. १३/२ व १३/३ जागेत झालेल्या अनधिकृत भरावाची लेखी माहिती देण्यात आली. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी १०६६ ब्रासचा पंचनामा केला व त्यानुसार ४९ लाख ३८ हजार ५११ रुपयाची दंडात्मक नोटीस सुनील गोविंद कटारिया यांना १० जुलै २०२५ बजाविण्यात आली आहे. उपरोक्त दंडाची रक्कम कसूरदार सुनील गोविंद कटारिया यांनी सदरचे आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आता शासनास जमा करावी, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कटारिया यांनी उक्त नमूद दंडनीय रक्कम ७ दिवसांच्या आत शासन जमा नाही केल्यास ग्राम महसूल अधिकारी गौरकामत यांनी सदरील रकमेच्या बोजाची नोंद उक्त नमूद जमीन मिळकतीच्या गा. न. नं. ७/१२ च्या इतर अधिकारात घेऊन तसा गा. न. नं. ७/१२ उतारा व फेरफार या कार्यालयास सादर करण्यात यावा असे देखील नोटीसमध्ये कर्जत तहसीलदार यांनी म्हटले आहे.
कर्जत व खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असेच अवैध अनधिकृत उत्खनन, मुरूम व मातीचे भराव करण्यात आले आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्य्क यांना सुरु असलेल्या उत्खननाची गोपनीय माहिती दिल्यास गोपनीय माहिती देणाऱ्यांचे नाव, नंबरसह भू-माफियाना देऊन गोपनीय माहिती देणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला जात आहे, असेही पत्रकार राजेंद्र जाधव यांनी सांगितले. भू-माफियांनी सोडलेले दलाल परिसरात प्रसाद वाटप करीत दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. भू माफियाकडून प्रकरण मिटवण्यासाठी एका भुरट्याला दहा व चाळीसचा आशिर्वाद देऊन प्रसाद देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच या भुरट्याला मौजमजा करण्यासाठी शेजारील राज्यात फिरण्यासाठी पाठविण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे सत्याचे पाठ शिकवणारा भुरटा भ्रष्टाचाराच्या गंगेत बडबडला असून ज्ञान वाटत फिरत असल्याची चर्चा जोमाने सुरु आहे.
नाममात्र रॉयल्टी भरून शासनाच्या कोटृयवधी रुपयांच्या महसूलावर डल्ला मारणाऱ्या भू-माफियांची माहिती देऊन महसूल विभागाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर करून देणारा गोपनीय देशभक्त गुन्हेगार आहे का ? गोपनीय माहिती देणाऱ्यांचे नाव, नंबर भू-माफियांना देणारे तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक यांची सखोल चौकशी करून भू-माफियांनी केलेल्या अधिकृत उत्खनन व भरावाचे पंचनामे तपासून पुन्हा नवाने 'इन कॅमेरा' पंचनामे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे व कामात कसूर करणाऱ्या लोकसेवकांवर कार्यवाही करून त्यांना निलंबित करावे. अनधिकृत उत्खनन व भरावाची तक्रार कर्जत-खालापूर तहसील कार्यालयात दिल्यावर तक्रारदाराला माहिती देण्यास विलंब का केला जातो ? या लोकसेवकांना शासनाकडून मोठा पगार, शासनाचे सर्व लाभ मिळत नाहीत का ? दुपारी जेवणाच्या नावाखाली सर्रासपणे दालनात उपस्थित नसतांना लाईट, पंखे तासन्तास सुरु का ठेवले जाते ? महिन्याला येणारे अंदाजे वीज बिल 16 हजार हे कुणाच्या खिश्यातून भरण्यात येते ? उत्खनन व भरावाची तक्रार प्रत्येकवेळी मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनी केल्यावर कर्जत - खालापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार माहिती देणार का ? कर्जत - खालापूर तहसील कार्यालयातून अनधिकृत उत्खनन व भरावाची माहिती सर्वसामान्य जनता जनार्दन व पत्रकारांना देण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ का केली जाते ? वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता जनार्दन व पत्रकारांच्या विनंतीनुसार याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केली आहे. कार्रवाई न झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home