देह झाला चंदनाचा..
खालापुर/सुधीर देशमुख :- कै सोमनाथ मुरलीधर मोरे म्हणजेच आमचे मोरे सर. त्यांच्या अकाली जाण्याने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यातील वावोशी गाव ही सरांची कर्मभूमी. स्वामी विवेकानंद संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. तसेच तेथे 27 वर्षे काम करून वावशी येथेच ते जानेवारी 2025 मध्ये निवृत्त झाले.
मला सरांचा सहवास 24 ते 25 वर्षे लाभला. मी वैद्यकीय व्यवसायाकरिता वावोशी भागात असताना सरांची भेट झाली व आमच्या स्वभावाच्या तारा जुळल्या गेल्या. व या जुळलेल्या तारा अखंड राहिल्या. त्यांनी मला वावोशी व छत्तीशी परिसरात वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यास खूप मदत केली, अगदी रुग्णाच्या ग्रह भेटीला जाण्यास पण ते माझ्याबरोबर बॅग घेऊन तयार असत रात्री अपरात्री ते माझ्याबरोबर गृहभेटी करता येत.
सरांचा स्वभाव अतिशय संयमी मितभाषी व सात्विक होता. त्यांना रागावताना किंवा क्रोधित होताना मी कधीच पाहिले नाही विद्यार्थ्यांवर कार्यकारण ते रागावले असतील तो भाग वेगळा.पंढरी म्हणजेच पंढरपूरचे रहिवाशी असल्याची छाप त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे विद्यार्थ्यांची व गोरगरिबांची सतत मदत करणे त्यांच्या उपयोगी पडणे अडल्या नडलेल्याला मार्ग काढून मदत करणे इतरांचे हित जपणे कोणाच्या हृदयावर जखम होईल असे न वागणे न बोलणे तसेच ते निर्व्यसनी सत्याचे कैवारी सज्जन सदाचरणी व संयमी असे सर्व गुण असणारे होते.
त्यांचा विद्यार्थी वर्ग आज ठाणे मुंबई व रायगड परिसरात पसरलेला आहे व त्यांना आजी व माजी विद्यार्थी खूप मान त असत. संस्थेच्या इमारतीसाठी त्यांनी गावोगावी जाऊन देणगी उभारली.
सरांनी गोदरेज कंपनीच्या माध्यमातून संस्थेसाठी एक भव्य वास्तूची उभारणी करण्यात मोठे योगदान दिले. संस्थेचे नाव रहावे वाढावे त्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. तसेच सर आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक साहित्य देऊन फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असत तसेच त्याचा त्यांनी कधीही गवगवा केला नाही किंवा कुठलीही जाहिरात केली नाही ते त्यांचे मोठे काम होते. ते स्वतः गरिबीतून वर आले असल्याने त्यांना गरिबीची जाण होती सर्वांना शिक्षण मिळावे चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची नेहमीच धडपड होती.
यामध्ये सरांच्या कुटुंबानेही तेवढीच मोलाची साथ दिली. श्रीमती शुभांगी दाभाडे मोरे - दाभाडे या त्याच भागात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सरांना नेहमीच त्यांचा भक्कम आधार व पाठिंबा राहिला त्यांना दोन मुले आहेत मुलीचे शिक्षण एम फॉर्म झाले असून तिचे लग्न झाले आहे.तिला आयटी क्षेत्रातील मुलगा वर म्हणून मिळाला. सरांचे जावई सुविध्य व विनयशील आहेत.
त्यांचा मुलगा स्वप्निल हा इंजिनियर झालेला असून तो सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे तो स्वभावाने प्रेमळ व सरांप्रमाणेच सज्जन आहे.
आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लोक दक्षिणा म्हणून चंद्रभागेमध्ये जे नाणी फेकत त्या ठिकाणी बुडी मारून तेथील वाळू वर आणून व चाळणीने ती वाळू चाळली जाई. त्या चाळण्यातून जी नाणी मिळत ती नाणी व तो पैसा सरांच्या घरी बऱ्याच वेळा चरितार्थासाठी वापरावा लागत असे. एवढी तीव्र गरिबी त्यांनी अनुभवली होती याचे वर्णन बऱ्याचदा त्यांनी मला सांगितल्याचे स्मरते.
मोरे सरांनी कायम संघर्ष टाळला व दुसऱ्यांच्या मधील असलेला संघर्ष कमी करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिलेले मी पाहिले आहेत.
सरांचा मित्रपरिवार खूप मोठा होता एक सज्जन सच्चा सरदही मित्र म्हणून सर्वांना त्यांचे कौतुक व आदरभाव असे खोपोलीमध्ये असताना ते सकाळ संध्याकाळ कायम वॉकिंग करता जात असत तेथे श्री गोरे सर, श्री चव्हाण सर, श्री केवले सर, श्री दिवटे सर, श्री वडगावे सर श्री विजय चव्हाण अशोक दरेकर व स्वतः मी पण उपस्थित असे. असा आमचा एक आगळा वेगळा वॉकिंग ग्रुप तयार झाला होता.
त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे आमच्या या वॉकिंग ग्रुप वर शोक कळा पसरली एक सज्जन सहृदय साथीदार आपल्यापासून दुरावल्याचे दुःख खरोखर खूप मोठे आहे. श्री. आर. एस. पाटील श्री विजयजी पाटील व इतर अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ तालुक्यातील व्यक्ती त्यांच्याशी खूप जवळ होत्या त्यांचे व या व्यक्तींचे खूप स्नेहपूर्वक संबंध होते.
सरांच्या निवृत्तीच्या वेळचा कार्यक्रम अतिशय सुंदर व अविस्मरणीय असा होता. हा सोहळा त्यांच्या मधल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा असा व डोळे पाणवणारा असा होता.
एक हाडाचा शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आमचे मोरे सर तसेच एक आदर्श माणूस व नागरिक कसा असावा याचे ते उत्तम उदाहरण व आमच्यासाठी ते आदर्श म्हणून राहतील.
केवळ चार ते पाच दिवसाच्या कालावधीत बघता बघता काही कळायच्या आत अल्प आजाराने काळाने त्यांना आमच्यातून नेले.
म्हणतात जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला...
अशा या ज्येष्ठ बंधू व मित्रवर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉक्टर सुनील देवडीकर खोपोली.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home