Thursday, July 10, 2025

हाळ कब्रस्तानामध्ये करण्यात आली स्वच्छता

 


मुस्लिम बांधवानी मानले मुख्यधिकारी पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रणजीत पवार यांचे आभार !  

खोपोली / खलील सुर्वे - खोपोली नगर परिषद हद्दीत येणाऱ्या हाळ बुद्रुक गावातील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उंचच उंच गवत, झाडीझुडपे वाढल्याने विषारी साप, विंचूसारख्या जनावरांच्या भीतीने कब्रस्तानमध्ये जाणे जिगरीचे झाले होते. मुस्लिम समाजामध्ये मृत झाल्यास कबर खोदून दफनविधी करण्यात येते. कब्रस्तानमध्ये प्रचंड वाढलेल्या गवत, झाडीमुळे कबर खोदण्यास तसेच आधीच्या जुन्या कबरी गवताने झाकल्याने दिसून येत नसल्यामुळे कबर कुठे खोदावी, असा प्रश्न उपस्थित होत होता. मोहरम सणाच्या आधी खोपोली नगर परिषदेच्या उद्यान विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांना ग्रामस्थांनी दूरध्वनीवर संपर्क साधला व कब्रस्तानामध्ये वाढलेले उंचच उंच गवत, जंगली झाडेझुडपे मोहरमचा सण येण्याआधी स्वच्छ करण्यासाठी तोंडी विनंती केली होती. तसेच उद्यान विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांनी सण येण्याआधी स्वच्छ होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मुस्लिम बांधवाचा मोहरम सण होवून तीन दिवस उलटूनही कब्रस्तानमध्ये वाढलेले गवत, झाडी स्वच्छ करण्यात आले नव्हते.


कब्रस्तान मधील भ्रमसाठ वाढलेले गवत, झाडी स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील व उप मुख्याधिकारी रणजित पवार यांच्याकडे विनंती करण्यात आली. मुस्लिम बांधवांची समस्या लक्षात येताच व विनंतीची ताबडतोब दखल घेऊन लगेच उद्यान विभागाला कब्रस्तानात वाढलेले गवत, झाडीझुडपे स्वच्छ करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत रात्री उशिरापर्यंत मशीनद्वारे कब्रस्तानमधील वाढलेले गवताचे जंगल झाडे कापून स्वच्छता करण्यात आली. मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांनी मुस्लिम बांधवांच्या विनंतीची दखल घेऊन कब्रस्तान स्वच्छ केल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी कौतुक करीत साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले. या पुढे देखील मुस्लिम बांधवाना असेच सहकार्य करावे, अशी विनंती ही करण्यात आली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home