Friday, December 5, 2025

वनवे येथे श्रद्धेच्या उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव संपन्न

 

* सामुदायिक काकड आरती, भजन, कीर्तन, महाप्रसाद आणि पालखी सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती


खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील वनवे - निंबोडे तसेच खालापूर दहिवली तर्फे बोरेटी, बीड खुर्द आणि खोपोली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या संपूर्ण परिसरात दिवसभर अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

* पहाटे काकड भजनाने उत्सवाची सुरुवात :- 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत सामुदायिक काकड भजन आरती पार पडली. पहाटेपासूनच गावात भक्तिमय निनाद घुमत होता आणि अनेक भाविकांनी उपस्थित राहून या आरतीचा लाभ घेतला.


* संगीत भजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद :- सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळ, कुंभिवली व आषाढी वारी पंढरपूर ग्रुप यांच्या वतीने संगीत भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.


* महाप्रसादाने भाविकांची सेवा :- दुपारी 12 ते 1 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

हा महाप्रसाद खालापूरचे व्यापारी शामसुंदर शेठ जाखोटिया यांच्या वतीने देण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

* दुपारनंतर कीर्तन, हरिपाठ आणि जागर भजन :- दुपारी 4 ते 6 युवा कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज राणे यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.


सायंकाळी 6 ते 7 वनवे - निंबोडे व खालापूर परिसरातील भाविकांनी सामुदायिक हरिपाठ केला.

संध्याकाळी 7 ते 9 दुसरा महाप्रसाद भरतशेठ सोनी, खोपोली यांच्या वतीने देण्यात आला.

रात्री 9 ते 10 वनवे - निंबोडे व खालापूर समूहाने जागर भजन सादर केले.


* पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता :- रात्री 10.30 ते 11.30 दरम्यान उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. टाळ - चिपळे, भजन, दत्त जयघोष यांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.


* 44 वर्षांची परंपरा आजही सुरू :- हा दत्त जन्मोत्सव गेली 44 वर्षे अविरतपणे पार पडत असून वैकुंठवासी काशिनाथ बाबा नाटे यांची प्रेरणा, गुरुदादा महाराज राणे यांचे मार्गदर्शन, परशुराम खंडू पार्टी यांची दैवी प्रेरणा आणि वैकुंठवासी ह. भ. प. सदाशिव पार्टी यांच्या कार्यविस्तारामुळे हा सोहळा आजही अतिशय भव्यतेने साजरा केला जात आहे. यावेळी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाला गौरव प्राप्त करून दिला. 


Wednesday, December 3, 2025

बोरिवली आणि खोपोली येथे साजरा होणार श्री दत्तजयंती उत्सव

 


खालापुर/प्रतिनिधी :- सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी स्थापन केलेल्या "ओम सद्गुरू प्रतिष्ठान" या परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी महाराज यांच्या बोरिवली आणि खोपोली येथील स्थानांवर यंदाचा श्रीदत्तजयंती उत्सव मार्गशीर्ष १५ शके १९४७ म्हणजेच गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. श्रीदत्तजयंती निमित्त दोन्ही स्थानांवर सकाळी महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात येईल.


ओम सद्गुरु प्रतिष्ठान, मोगलवाडी, खोपोली येथे सकाळच्या सत्रात प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व परमपूज्य सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांची महापूजा, रुद्राभिषेक पवमान सूक्तपठण संपन्न होईल तसेच संध्याकाळच्या सत्रात सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर तथा आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या अमृतवाणीत होणाऱ्या श्रीदत्तजन्म अध्यायाचे वाचन व नंतर "नमो गुरवे वासुदेवाय" या नामजपाचा गजर याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल. संध्याकाळी ७.२५ वाजता स्वामी महाराजांची आरती होईल. 

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आरती नंतर रात्री ८.१५ वा. होणाऱ्या स्वामी महाराजांचा पालखी सोहळा! या पालखी सोहळ्यानंतर दर्शन, तीर्थ व महाप्रसाद होऊन या उत्सवाची सांगत होईल.  

या उत्सवाला जास्तीत जास्त भक्तांनी हजेरी लावून प प श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे व सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांचे आशीर्वाद प्रदान करून घ्यावेत असे विनम्र आवाहन विश्वस्तांनी व अश्र्वपरीस फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष इशिका शेलार यांनी केले आहे.

Monday, December 1, 2025

स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया जाहीर

 


डिसेंबरला स्ट्राँग रूम सील, 3 डिसेंबरला मतमोजणीसाठी उघडणार - पारदर्शकतेला प्राधान्य


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या मतदान प्रक्रियेला वेग येत असताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे स्ट्राँग रूम संदर्भातील महत्त्वाची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) सुरक्षितपणे साठवणे, त्यांची सीलबंद प्रक्रिया आणि मतमोजणीपूर्व उघडणी हे सर्व टप्पे पूर्ण पारदर्शकतेने आणि उमेदवार / प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत.


* स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रियेचे वेळापत्रक :- स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 (मंगळवार) रात्री साधारण 10 वाजता (मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर) सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली, स्ट्राँग रूम उघडणे...या प्रक्रियेस सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. EVM स्ट्राँग रूममध्ये ठेवताना सील कशा प्रकारे लावली जाते हे संबंधितांना प्रत्यक्ष पाहता येईल.


मतमोजणीकरीता 3 डिसेंबर 2025 (बुधवार) सकाळी 9.30 वाजता सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी नियोजित वेळी अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी स्ट्राँग रूम उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. हा टप्पा निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून पूर्ण पारदर्शकतेने राबविला जाणार आहे.


* उमेदवार व प्रतिनिधींसाठी महत्त्वाच्या सूचना :- उपस्थित राहणाऱ्यांकडे वैध ओळखपत्र असणे अनिवार्य, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक, स्ट्राँग रूम परिसरात अनावश्यक गर्दी, गोंधळ किंवा नियमभंग टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया निवडणुकीतील शुचिता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


* लोकशाही बळकट करण्याचा निर्णायक टप्पा :- या अधिसूचनेमुळे खोपोली नगर परिषद निवडणुकीतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक दृढ होणार असून, नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास आणखी वृद्धिंगत होईल. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही शंकेस तोंड न देता निष्पक्षपणे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प या सूचनेतून स्पष्ट होत आहे.


खोपोलीचे नंदनवन करू !

 


 कुलदीपक शेंडे : महापुरुषांना अभिवादन, घोषणांनी दुमदुमली सभा

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य शक्तिप्रदर्शन सभा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रचारार्थ झालेली ही सभा विक्रमी गर्दीने दणाणून गेली.


“येऊन येऊन येणार कोण ? कुलदीप शिवाय आहेच कोण!” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. फटाक्यांची आतषबाजी आणि युवक-कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे सभेला मेळाव्याचे स्वरूप आले.

सभेच्या प्रारंभी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाला वंदन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती देऊन करण्यात आले.


सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, कर्जत-खालापूर आमदार महेंद्र थोरवे, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, महायुती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच भाजप, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व नागरिक आदी उपस्थित होते. 

सभेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे आणि उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी स्पष्ट आवाहन केले की, खोपोलीचा विकास हवा असेल, स्थिर व सक्षम नेतृत्व हवे असेल तर महायुतीच्या सर्व 1 ते 15 प्रभागातील उमेदवारांना मतदान करा. नगराध्यक्ष पदासाठी ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील  बटन दाबुन असंख्य बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन केले आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कुलदीपक शेंडे यांनी खोपोलीचा संपूर्ण विकास आराखडा जनतेसमोर स्पष्टपणे मांडला. असा व्यापक व्हिजन असलेला नेता खोपोलीला लाभणे हीच खऱ्या अर्थाने प्रगतीची सुरुवात आहे. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, 3 तारखेला कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले की मी स्वतः त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीसजींकडे जाईन. खोपोलीच्या विकासासाठी जी वचने दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि महेंद्रजींची राहिल.

याप्रसंगी भाई शिंदे, नरेंद्र गायकवाड, दिनेश थोरवे, अनिल मिंडे, नितीन वाघमारे, मोहन औसरमल, सोनिया रुपवते, प्रिया जाधव तसेच 1 ते 15 प्रभागातील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला आघाडी, युवा मोर्चा, हजारो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.



Saturday, November 29, 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप

            


देगलूर/जावेद अहमद :- आज दिनांक 28 /11 /2025 रोजी नाम फाउंडेशन व बीएसएफ संस्थेअंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.


      त्यासोबतच क्रिसील फाउंडेशनच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत चालणारा प्रकल्पाद्वारे देगलूर तालुका समन्वयक संगीता वाघमारे यांनी गावातील महिलांना आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिले विमा पेन्शन सुकन्या योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधासनमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, डिजिटल व्यवहार,नामांकन व रिकेवायसी तसेच बचत गुंतवणूक, आर डी एफ डी,आणि पीपीएफ योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी असंख्य महिला असंख्य महिला, शेतकरी उपस्थित होते.

खोपोलीकरांच्या मनातील कोहिनूर कोण ?

 



* नगराध्यक्षपदावर कुणाची मोहोर बसेल ?

 सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर संताप, समस्यांचे डोंगर आणि मतदारांचा थेट सवाल - अजून किती वर्षे संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा ?


खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक केवळ काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. जुन्या - नव्या उमेदवारांचा उत्साह, मोठ्या नेत्यांच्या सभा, आरोप - प्रतिआरोपांनी रंगणारा प्रचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांच्या मनात निर्माण झालेले असंतोषाचे वादळ, या सर्वांमुळे खोपोलीची निवडणूक अधिकच रोचक झाली आहे.


या पार्श्वभूमीवर खोपोलीकरांचा थेट सवाल असा आहे की, “इतकी वर्षे सत्ता देऊन काय झाले ? आता पुन्हा त्यांनाच संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा का ? 


* खोपोलीकरांच्या डोळ्यांतला राग - उमेदवारांच्या दाव्यांना मूक विरोध ? :- प्रत्येक उमेदवार आपापली ताकद दाखवत आहे. एक संधी द्या, आम्ही विकास करतो...शहराचा विकास आमच्यामुळेच झाला, असे दावे करीत आहेत. तर दुसरीकडे मोठमोठ्या सभांमध्ये नेते एकमेकांवर टीका करीत राजकीय वातावरण तापवत आहेत. परंतु मतदारांचा प्रश्न मात्र सरळ आणि स्पष्ट आहे की, मग इतकी वर्षे खोपोलीची अवस्था बदलली का ?

* पाणीटंचाई ते रस्ते - खोपोलीकरांचे प्रश्न संपत नाहीत :- मतदारांनी मांडलेल्या प्रमुख समस्या अशा की, 


- पाणी समस्या :- 10 महिन्यांचा साठा करणारा तलाव नाही, शहरात पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था नाही, पातळगंगा नदी वर्षभर वाहत असली तरी नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असते. अनेक भागातील महिलांना बारमाही नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या खोपोली नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढावा लागत असतो, ही शोकांतिका नाही का ? 

- नव्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीत :- नूतन रुग्णालय असूनही एक्स-रे मशीन नाही, सिटीस्कॅन नाही, एमआरआय नाही, रक्त तपासणी प्रयोगशाळा नाही, आयसीयू पूर्ण नाही, एमडी / एमबीबीएस तज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.

- सरकारी शाळांची बिकट अवस्था :- पायाभूत सुविधांचा अभाव, इमारतींची जीर्ण अवस्था आहे. शैक्षणिक दर्जा खावावला आहे. 

- भाजी मार्केटची अवस्था दयनीय :- मोडकी, ढासळलेली मार्केट इमारत नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

- कोट्यवधी खर्चाचे रस्ते असूनही खड्ड्यांचा त्रास :- डांबरी आणि काँक्रीट रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे.

- स्ट्रीटलाइट असूनही काही भाग रात्री अंधारात :- वीज असेल, दिवे असतील… पण प्रकाश नाही!

- भूमिगत गटार असूनही सांडपाणी नद्येत :- कोट्यवधींच्या प्रकल्पानंतरही पातळगंगेत दूषित पाणी सोडले जात आहे.

- स्वच्छतेसाठी 12 कोटी वार्षिक खर्च - तरीही गल्लीबोळ अस्वच्छ :- कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरे, डास–माशांचा उपद्रव.

- वाहतूक कोंडीचा जीवघेणा प्रश्न :- खोपोली शिळफाटा येथे वर्षानुवर्षे कोंडी ; रुग्णवाहिका अडकणे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. मतदारांचा सवाल आहे की, 10 वर्ष, 15 वर्ष नगरसेवक...महिने, दोन महिने, सहा महिने, एक वर्ष, पाच वर्ष नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष होते, तेव्हा या समस्यांवर कोणाचेही लक्ष गेले नाही का ?


* आधी काय केले, आता काय करणार ? :- अनेक वर्षांचे नगरसेवक, नगराध्यक्ष, नेते यांच्यावर नागरिकांचा थेट राग व्यक्त होत आहे. बापजाद्यांना संधी दिली, दिवे लावले का ? आता तुम्हाला संधी दिल्यावर काय होणार ? स्वतःच्या परिसराचा रस्ता सुधारू शकले नाहीत, शहराचा काय विकास करणार ? नागरिकांचा असा आरोप आहे की, मत मिळवण्यासाठी उमेदवार घराघरात येतात, पण मतदार समस्या घेऊन गेले की “नेते विकासकामात व्यस्त” असा बहाणा केला जातो.

* खोपोलीचा ‘कोहिनूर’ कोण ? मतदारच ठरवणार :- नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण दावेदारी करू लागले आहेत. परंतु खरा कोहिनूर कोण ? अनुभवी उमेदवार ?नवीन चेहरा ? किंवा संघटित पक्षयंत्रणेचा पाठिंबा मिळवणारा ? हे ठरविण्याचे काम आता खोपोलीकरांच्या हातात आहे.



* 3 डिसेंबरला मतपेटीतून उत्तर मिळणार :- सध्या खोपोलीत जनतेचा आक्रो, राजकीय पक्षांचे आरोप - प्रत्यारोप, विकासाच्या आश्वासनांची गर्दी अशी परिस्थिती आहे. मतदार मात्र शांतपणे सर्व पाहत आहेत. 3 डिसेंबरला खरे उत्तर मतपेटीतून बाहेर येईल व कोहिनूर कोण ठरणार आणि कुणाची वरात निघणार ? हे त्याच दिवशी समजेल.

रविवारी खोपोलीत महायुतीची शक्तीमेळावा सभा

 


नगराध्यक्षपदाच्या रणधुमाळीत कुलदीपक शेंडे यांच्या प्रचाराला वेग

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन ; शिवसेना, भाजप व आरपीआयचे दिग्गज नेते एकत्र - ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे भव्य शक्तिप्रदर्शन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेसाठी शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे.

या सभेचे प्रमुख मार्गदर्शक भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण असून खोपोली शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


* महायुतीची निवडणूक मोहीम निर्णायक टप्प्यात :- या सभेत महायुतीचे दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. यामध्ये प्रमुख उपस्थिती मा.आ. रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप), आमदार प्रसाद लाड, आमदार अप्पासाहेब गोगावले, आमदार श्रीधर पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच शिवसेना, भाजप आणि आरपीआय (आठवले गट) यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमुळे खोपोलीतील महायुतीची निवडणूक मोहीम जोरदार गतीने पुढे सरकत असून ही सभा निवडणुकीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


* कुलदीपक शेंडे - विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला महायुतीचा विश्वासू चेहरा :- खोपोलीचे सर्वांगीण रूपांतर करण्यासाठी महायुतीने कुलदीपक रामदास शेंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या प्रचारातील मुख्य मुद्दे दर्जेदार पाणीपुरवठा सुधारणा, शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, खोपोली - शिळफाटा वाहतूक कोंडी निवारण, स्वच्छतेची व्यापक मोहीम, तरुणांसाठी रोजगार संधींची निर्मिती या सर्व मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन देत महायुती खोपोलीकरांत विश्वास बाळगून आहे.


रविवार, 30 नोव्हेंबर 2025, सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, खोपोली येथे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


खोपोली नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. यावेळी महायुतीने स्पष्ट आवाहन केले आहे की, नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांना विजय मिळावा, यासाठी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करा, असे आवाहन शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, भाजप खोपोली अध्यक्ष अजय इंगुळकर, आरपीआय (आठवले गट) अध्यक्ष नितीन वाघमारे यांनी केले आहे.


* खोपोलीच्या विकासासाठी सक्षम, मजबूत नेतृत्वाची गरज :- सभेच्या निमित्ताने महायुतीने नागरिकांसमोर घोषवाक्य ठेवले की, खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर सत्ता आणि प्रामाणिक नेतृत्व अत्यावश्यक आहे. महायुती एकदिलाने खोपोलीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.