खोपोलीचे नंदनवन करू !
कुलदीपक शेंडे : महापुरुषांना अभिवादन, घोषणांनी दुमदुमली सभा
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य शक्तिप्रदर्शन सभा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रचारार्थ झालेली ही सभा विक्रमी गर्दीने दणाणून गेली.
“येऊन येऊन येणार कोण ? कुलदीप शिवाय आहेच कोण!” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. फटाक्यांची आतषबाजी आणि युवक-कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे सभेला मेळाव्याचे स्वरूप आले.
सभेच्या प्रारंभी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाला वंदन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती देऊन करण्यात आले.
सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, कर्जत-खालापूर आमदार महेंद्र थोरवे, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, महायुती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच भाजप, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व नागरिक आदी उपस्थित होते.
सभेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे आणि उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी स्पष्ट आवाहन केले की, खोपोलीचा विकास हवा असेल, स्थिर व सक्षम नेतृत्व हवे असेल तर महायुतीच्या सर्व 1 ते 15 प्रभागातील उमेदवारांना मतदान करा. नगराध्यक्ष पदासाठी ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटन दाबुन असंख्य बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन केले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कुलदीपक शेंडे यांनी खोपोलीचा संपूर्ण विकास आराखडा जनतेसमोर स्पष्टपणे मांडला. असा व्यापक व्हिजन असलेला नेता खोपोलीला लाभणे हीच खऱ्या अर्थाने प्रगतीची सुरुवात आहे. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, 3 तारखेला कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले की मी स्वतः त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीसजींकडे जाईन. खोपोलीच्या विकासासाठी जी वचने दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि महेंद्रजींची राहिल.
याप्रसंगी भाई शिंदे, नरेंद्र गायकवाड, दिनेश थोरवे, अनिल मिंडे, नितीन वाघमारे, मोहन औसरमल, सोनिया रुपवते, प्रिया जाधव तसेच 1 ते 15 प्रभागातील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला आघाडी, युवा मोर्चा, हजारो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home