खोपोलीत 2 एप्रिल रोजी भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
कर्ज काढून लग्न करू नका; सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा – सहज सेवा फाउंडेशनचा संदेश
खोपोली/प्रतिनिधी :- आर्थिक अडचणींमुळे लग्नासाठी कर्जबाजारी होणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा” असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सहज सेवा फाउंडेशन गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. 2016 पासून आजारी व्यक्तींना अल्पकाळासाठी वैद्यकीय उपकरणे सेवा, 1 जानेवारी 2019 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना मोफत जेवण, 2020 पासून ‘सहज स्वर्ग रथ’ व शवपेटी सेवा, तसेच आदिवासी पाड्यांवर जनजागृती, शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण आणि सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
याशिवाय ‘झाडाखालची शाळा’, पाताळगंगा नदी पूजन, तसेच खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत कन्या जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान यांसारख्या उपक्रमांची राज्यभर दखल घेतली गेली असून काही उपक्रमांची जागतिक विक्रमांमध्ये नोंद झाली आहे.
आजच्या काळात मुलामुलींच्या शिक्षणावर मोठा खर्च केल्यानंतर विवाहासाठी कर्ज काढण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येते. त्यामुळे आयुष्यभर कर्जाचा भार सहन करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सामुदायिक विवाह हा प्रभावी पर्याय ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी 5 सप्टेंबर 2021 तसेच 2 एप्रिल 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांतही मोठ्या उत्साहात सामुदायिक विवाह सोहळे पार पडले आहेत. त्या यशस्वी परंपरेला पुढे नेत यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यातील सर्व विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने निश्चित करण्यात आले होते. विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला अधिकृत नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, प्रकल्प प्रमुख जयवंत सिद व दिवेश राठोड, महिला अध्यक्षा नीलम पाटील, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर, युवा अध्यक्षा सागरिका जांभळे, तालुका अध्यक्ष मोहन केदार, मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे पौरहित्य अजित दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद सोळंकी यांनी केले.
या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, संघटक पंकज पाटील, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment