Monday, August 11, 2025

खोपोली शिळफाटा पोस्ट ऑफिस गायब

 



नागरिकांची गैरसोय...

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शिळफाटा येथील पोस्ट ऑफीस मागील गेल्या अनेक वर्षापासून भाडे तत्वावर आनंद शाळा परीसरात सुरू आहे. दरम्यान, संबधित जागा मालकाने भारतीय डाक विभागाची कोणतीच परवानगी न घेता तसेच या पोस्ट कार्यालयाचे योग्य कार्यालयात स्थलांतर न करता काम सुरू केल्याने पावसात कागदपत्रांची चांगलीच हेळसांड झाली. जागा मालकाकडून पर्यायी जागा ही पुरेशी न देण्यात आल्याने आता खोपोली शिळफाटा येथील पोस्ट कार्यालय वरची खोपोली येथे हलविण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. 

दुसरीकडे, भारतीय टपाल खात्याने 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांची रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग आहे. ही सेवा बंद करण्याचा उद्देश काम अधिक जलद चालविणे आहे. आता रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पिड पोस्टमध्ये विलीन करण्यात येणार असल्याने ही 50 वर्षांहून अधिक जुनी सेवा इतिहास जमा होणार आहे. 

खोपोली शिळफाटा पोस्ट ऑफिस यांनी स्वतःच्या मनमर्जीने नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुचना न देता पोस्ट ऑफिस खोपोली येथे हलविले आहे. नागरिकांनी चौकशी केल्यास पोस्ट ऑफिसमध्ये गळती होत असल्याने खोपोली येथे पोस्ट ऑफिसचे काम सुरु आहे, अशी उत्तरे देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी काम सुरु आहे, तिथे देखील नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. प्रत्येक कामासाठी सर्व्हर प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे काढायचे आहेत सर्व्हर प्रॉब्लेम...लेटर पाठवायचे आहे सर्व्हर नाही...आयपीपीबी (IPPB) खाते सुरु करायची आहे, केवायसी करायची आहे, यासाठी देखील सर्व्हर प्रॉब्लेम आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, जाण्या-येण्यासाठी प्रवास खर्च होत असतो. लहानसहान गोष्टींसाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. मग पोस्ट ऑफिसमध्ये काम होते तरी कोणते, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शासनाने पोस्ट ऑफिस हे सामान्य जनतेच्या कामासाठी दिले आहेत की आपल्या मर्जीने लोकांना उत्तरे देऊन काम टाळण्यासाठी ठेवले आहे, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.

1 Comments:

At August 12, 2025 at 5:43 AM , Blogger Dhananjay Amrute said...

खोपोली पोस्ट ऑफिसमध्ये अजूनही गंभीर तांत्रिक अडचणी आहेत. इथले प्रिंटर अनेकदा चालत नाहीत आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स पाठवताना मिळणारी पावती काही वेळा हाताने लिहून दिली जाते. अशा हाताने लिहिलेल्या पावत्यांमुळे पुढे कधीही गैरसमज, गहाळ होणे किंवा चुकीचे रेकॉर्ड तयार होण्याचा धोका संभवतो. अशा वेळी जबाबदार कोण ठरणार? नागरिकांना सुरक्षित, डिजिटल आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही त्यांची मूलभूत अपेक्षा आहे, आणि पोस्ट ऑफिसने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home