Friday, November 21, 2025

माघारीनंतरचे चित्र बदलले !

 



खोपोली नगराध्यक्ष निवडणूक : सुधाकर घारे यांचे गणित चुकले का ? सुनील पाटील - रा. काँ. समोर नव्या अडचणी

* उध्दवसेनेची स्वबळावरची लढत, काँग्रेसचा पंजा, आपचा प्रभाव आणि पत्रकार साळुंके - मतांचे ‘गणित’ पूर्णपणे ढवळून निघाले!

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघारीनंतर आज निर्माण झालेले राजकीय वातावरण महायुतीच्या कुलदिपक शेंडे यांच्या बाजूने झुकतांना दिसत आहे. तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचे डॉं. सुनील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत.

* उध्दवसेनेचे 8 ते 8.5 हजार “फ्लोटिंग” मते अनिश्चित :- शिवसेना (उध्दव ठाकरे) स्वबळावर मैदानात उतरली असून, त्यांची 8 ते साडे आठ हजार मते कुणाकडे वळणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. या मतांचे काय होणार ? हे सर्वात मोठे कोडेच आहे.


* काँग्रेसचे तौफीक करजीकर ठाम :- काँग्रेसचे उमेदवार तौफीक करजीकर यांच्या पाठीमागे त्यांचि नातेवाईक वर्ग, अल्पसंख्याक समाजातील विश्वासू मतदार, त्यांचा मित्र परिवार आणि काँग्रेसच्या पारंपारिक ‘पंजा’ वारकऱ्यांची मते अंदाजे 5 ते 6 हजार आहेत. ही मते महायुतीला थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आवश्यक होती ; पण सुनील पाटील आणि एनसीपी नेतृत्व काँग्रेसची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.


* डॉं. रियाज पठाण यांच्या प्रवेशाने शहरातील समीकरणच बदलले :- आम आदमी पार्टी (AAP) चे नगराध्यक्ष उमेदवार डॉं. रियाज पठाण प्रभाग क्रमांक 9, 10 व 13, शिळफाटा, हाळ, भानवज, सुभाषनगर या भागांत चांगला प्रभाव पाडतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मतांच्या ‘स्लाइस’मुळे एकूण 2 ते 3 हजार मतांवर थेट परिणाम होईल, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. 


* पत्रकार किशोर साळुंके यांचा प्रभाव :- पत्रकार किशोर साळुंके यांचा खोपोलीत स्वतःचा स्वतंत्र असा मतदारवर्ग आहे. त्यांच्या मैदानात उतरण्यामुळे 500 ते 1000 मते कोणत्या बाजूला जातील ? हा निर्णायक प्रश्न निर्माण झाला आहे.


* शेंडे विरुद्ध पाटील : थेट लढत झाल्यास सुनील पाटील आघाडीवर :- जर ही लढाई थेट आमने-सामने झाली असती तर परिवर्तन आघाडीचे डॉं. सुनील पाटील किंचित वरचढ होते, असा अंदाज सूत्रांकडून वर्तविला जात होता. पण आता काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), पत्रकार साळुंके व उध्दव सेनेची स्वतंत्र लढत यामुळे विरोधी मतांचे तुकडे पडत आहेत, आणि त्याचा सरळ फायदा महायुतीचे कुलदिपक शेंडे यांना मिळतांना दिसत आहे.


* महायुतीचे वोट 'फिक्स' - शिवसेनेचा ‘किल्ला’ टिकणार ? :- महायुतीचा (शिंदे शिवसेना + भाजप + आरपीआय) मतदारवर्ग ठाम असल्याचे मानले जाते. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत खोपोलीत मोठी आघाडी घेतली होती. खोपोली शहराध्यक्ष संदीप काशिनाथ पाटील हे जरी महायुतीचे उमेदवार असले तरी, शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी ते रणनीती आखतांना दिसत आहेत.


* राष्ट्रवादीची गणिते चुकली ? फोडाफोडीत यश, पण रणनीतीत अपयश ? :- राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतील अनेक नेते आपल्या गटात आणले. प्रचारप्रमुख डॉं. शेखर जांभळेंना रातोरात “राष्ट्रवादीमय” केले गेले, पक्ष प्रवेशाला गती दिली, तरीही रणनीती आखण्यात मोठी उणीव दिसली. आजच्या घडीला मतांचे गणित हातातून गेले, असे दिसत असून अंदाजे 10 ते 15 हजार मतांवर ‘टांगती तलवार’ निर्माण झाल्याचे राजकीय सूत्रांकडून बोलले जात आहे.


* सुनील पाटील यांना आंतरिक विरोध - ‘क्रॉस वोटिंग’ची भीती कायम :- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुनील पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पक्षात अंतर्गत वाद दिसून आले होते. वरकरणी नाराजी शांत झाल्यासारखी वाटत असली तरी, क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही. हेच सुनील पाटील यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.


* पुढील 10 दिवस ठरविणार खोपोलीचे भविष्य :- उध्दव सेनेचे 8,000 + मते, काँग्रेसचा पंजा, AAP ची एन्ट्री, पत्रकार साळुंके यांची लढत यामुळे ही निवडणूक अधिकच तंग होत चालली आहे.


* 'गड आला पण सिंह गेला" अशी वेळ येणार का ? :- सुनील पाटील आणि सुनील तटकरे, सुधाकर घारे बिघडलेले गणित सुधारू शकतील का ? उध्दव सेना, काँग्रेस, आप आणि साळुंके यांच्या ‘फ्रॅक्चर्ड वोट्स’वर मात करू शकतील का ? हे आता 3 डिसेंबर 2025 रोजी स्पष्ट होईल. आगामी 10 दिवसांत सुनील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणींवर कशी मात करते आणि 3 डिसेंबर रोजी विजयी गुलाल उधळते का ? नाही तर गड आला पण सिंह गेला, अशी गत तर होणार नाही ना ? याची खबरदारी सुनील पाटील घेणार का ? सुधाकर घारे व सुनील तटकरे सर्व आलबेल करण्यात यशस्वी होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home